जकातीतून चालतोय १६० कुटुंबांचा गाडा
By Admin | Updated: July 10, 2014 00:52 IST2014-07-10T00:49:56+5:302014-07-10T00:52:57+5:30
मुस्लीम समाजाचा आदर्श : गरिबांना गेली सात वर्षे पुरविले जात आहे मोफत धान्य

जकातीतून चालतोय १६० कुटुंबांचा गाडा
भारत चव्हाण ल्ल कोल्हापूर अन्न सुरक्षा कायद्यानुसार गोरगरीब जनतेला अल्प किमतीत धान्य पुरवठा करणारी योजना अमलात आणल्यानंतर काही दिवसांतच तिचा बोजवारा उडाला, परंतु कमी किमतीत सोडाच अगदी मोफत धान्य वाटपाची योजना अखंडपणे सात वर्षे कोल्हापुरात सुरू आहे. अत्यंत गरीब अशा १६० कुटुंबांना प्रत्येक महिन्याला प्रत्येकी वीस किलो धान्य मोफत पुरविण्यात येत असून रमजान महिन्यात ‘विशेष सोय’ म्हणून तेल, साबण, चहापूड, सुका मेवा, आदी जीवनावश्यक वस्तूही थेट घरपोच केल्या जात आहेत. मुस्लिमबांधव नमाजला मशिदीत जातात. त्यावेळी नमाज पठण झाल्यानंतर प्रत्येक नमाजी हा आपल्या रोजच्या उत्पन्नातील काही रक्कम जकात म्हणून मोमीन बिरादरीकडे जमा करतो. या जकातीचा हिशेब अगदी काटेकोरपणे ठेवण्यात आलेला आहे. जमणाऱ्या जकातीमधून धान्य व इतर वस्तू खरेदी केल्या जातात. त्याचे पॅकिंग करून प्रत्येक महिन्याच्या ६ तारखेला न चुकता वाटप केले जाते. काही जणांना त्यांच्या घरी जाऊनही ते दिले जाते. मोमीन बिरादरीचे अध्यक्ष सिकंदर हाजी मोमीन हे आहेत, तर दस्तगीर हाजी मोमीन यांच्या कल्पनेतून आणि प्रयत्नांतून हा एक आदर्श उपक्रम साकारला आहे. तीन सेवेकरी सर्व प्रकारचे नियोजन व त्याप्रमाणे अंमलबजावणीचे काम करतात. गरीब १६० कुटुंबांना प्रत्येक महिन्याच्या ६ तारखेला प्रत्येकी दहा किलो गहू किंवा ज्वारी व दहा किलो तांदूळ व तिखट चटणीचा एक पुडा असे धान्य घरपोच करण्यात येते. रमजान महिन्यातही या कुटुंबांना इतरांप्रमाणे सणवार साजरा करता यावा म्हणून साखर, गोडेतेल, तूरडाळ, चहापूड, सुकामेवा, साबण, मीठ अशा जीवनावश्यक वस्तू मोफत दिल्या जातात. २००६ पासून हा उपक्रम कसलाही गाजावाजा न करता सुरू आहे. अलीकडेच एक व्यक्ती या कुटुंबातील व्यक्तीला सणाच्या दिवशी एक चांगली साडी भेट देते. मात्र, त्याचेही नाव गुलदस्त्यात आहे.