शिक्षक पतसंस्थेमधील १६ कोटी ठेवी रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:02 IST2021-02-05T07:02:10+5:302021-02-05T07:02:10+5:30

सरकारी शिक्षकाची संस्था म्हणून ठेवलेली रक्कम बुडणार नाही या आशेने व्यापारी, सर्वसामान्य, शेतकरी आणि छोटे व्यावसायिक यांनी हातकणंगले तालुका ...

16 crore deposit in Shikshak Patsanstha | शिक्षक पतसंस्थेमधील १६ कोटी ठेवी रामभरोसे

शिक्षक पतसंस्थेमधील १६ कोटी ठेवी रामभरोसे

सरकारी शिक्षकाची संस्था म्हणून ठेवलेली रक्कम बुडणार नाही या आशेने व्यापारी, सर्वसामान्य, शेतकरी आणि छोटे व्यावसायिक यांनी हातकणंगले तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेमध्ये आपली कमाई ठेव म्हणून ठेवली. २०१८ मध्ये ही संस्था डबघाईला आल्याची वार्ता कळताच सर्वच ठेवीदार हबकून गेले. संस्था नोंदणीवेळी हजार -बाराशे शिक्षक सभासद असलेल्या या संस्थेमध्ये आज स्थितीला साडेपाचशे सभासद आहेत. ठेवीचा दर चांगला, सभासदाना डिव्हिडंड वाटप, सोबत भोजनाची सोय असा बोलबाला असलेली संस्था संचालक मंडळाने आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीच्या गुंतवणुकीमुळे डबघाईला आली. २०१८ मध्ये सहकार विभागाने या संस्थेवर तालुका उपनिबंधकाची प्रशासक म्हणून नियुक्ती केली.

शिक्षक सभासद असलेल्या या संस्थेमध्ये ४ कोटी ५० लाखांची कर्ज आहेत, तर कर्जाच्या चौपट १६ कोटींच्या ठेवी आहेत. ठेवीमध्ये शिक्षक सभासदांच्या ठेवी नगण्य असून शेतकरी, छोटे व्यावसायिक, सर्वसामान्य गृहिणी, व्यापारी यांच्या ठेवी जादा असल्याने कर्जाची वसुली आणि ठेवी देण्याचे प्रमाण यामध्ये चौपट फरक असल्याने ठेवीदारांच्या रकमा रामभरोसे झाल्या आहेत.

कोट =

शिक्षक पतसंस्थेवर प्रशासक म्हणून काम करताना गेल्या दीड वर्षात ठेवीदारांना दहा -दहा हजाराच्या पटीत ठेवीचा परतावा केला आहे. आतापर्यंत दोन कोटी रक्कम परत केली आहे. कर्ज ४ कोटी ५० लाख आणि ठेवी १६ कोटी ठेवीदारांना रकमा द्यायच्या कशा असा आमच्यासमोर प्रश्न आहे. कर्जदार शिक्षक सभासदाच आहेत. त्यांच्याकडून वसुली थांबली आहे. ६२ शिक्षक कर्जदारांच्या वर १०१ कलमाखाली वसुलीसाठी शिरोळ उपनिबंधक यांच्याकडे दावे दाखल केले आहेत. जशी वसुली होईल तशी ठेवीदारांची देणी भागवली जातील. ८८ कलम खाली दोषी संचालकावर लवकरच कारवाई होईल.

डॉ. प्रगती बागल, प्रशासक आणि उपनिबंधक सहकारी संस्था हातकणंगले.

Web Title: 16 crore deposit in Shikshak Patsanstha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.