राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवासाठी विद्यापीठाचे १५४ जणांचे पथक
By Admin | Updated: November 25, 2014 00:43 IST2014-11-25T00:43:09+5:302014-11-25T00:43:24+5:30
या महोत्सवासाठी गेल्या आठवड्यापासून विद्यापीठ खेळाडूंचे सराव शिबिर झाले.

राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवासाठी विद्यापीठाचे १५४ जणांचे पथक
कोल्हापूर : राज्यस्तरीय १८ वा क्रीडा महोत्सव २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात होणार आहे. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाचा १५४ खेळाडूंचा संघ सहभागी होणार आहे. या महोत्सवासाठी गेल्या आठवड्यापासून विद्यापीठ खेळाडूंचे सराव शिबिर झाले.
राज्यातील सर्व विद्यापीठांचा सहभाग असलेल्या या महोत्सवाला महाविद्यालयीन, विद्यापीठस्तरीय खेळाडूंच्यादृष्टीने वेगळे महत्त्व आहे. त्यात बाजी मारण्यासाठी त्यांनी वर्षभर तयारी केलेली असते. यावर्षीचा महोत्सव औरंगाबादमध्ये होत आहे. त्यात शिवाजी विद्यापीठाचा संघ कबड्डी, खो-खो, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, अॅथलेटिक्स, तलवारबाजी या प्रकारात महिला व पुरुष गटात सहभागी होणार आहे.
संघात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्णांतील विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांतील एकूण १५४ खेळाडूंचा समावेश आहे. संघातील खेळाडूंचे विद्यापीठात गेल्या आठवड्यापासून सराव शिबिर घेण्यात आले. महोत्सवासाठी संघ उद्या, मंगळवारी रवाना होणार आहे.
विद्यापीठाचे क्रीडा विभागप्रमुख पी. टी. गायकवाड हे संघप्रमुख असून, रमेश भेंडिगिरी, वीरसेन पाटील (कबड्डी), जहाँगीर तांबोळी (खो-खो), एन. डी. पाटील, संजय पाटील (बास्केटबॉल), स्वप्निल पाटील, संदीप पाटील (व्हॉलिबॉल), राम पाटील, कांचन बेलद (अॅथलेटिक्स), शांताराम माळी (तलवारबाजी) हे प्रशिक्षक आहेत. डॉ. नैना अलजापूरकर व श्रीदेवी हिरुगडे या महिला संघव्यवस्थापक म्हणून काम पाहणार आहेत. (प्रतिनिधी)