‘सीपीआर’साठी १५० पदांची मंजुरी

By Admin | Updated: June 1, 2014 01:22 IST2014-06-01T01:21:53+5:302014-06-01T01:22:29+5:30

आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती

150 posts sanctioned for CPR | ‘सीपीआर’साठी १५० पदांची मंजुरी

‘सीपीआर’साठी १५० पदांची मंजुरी

राजेश क्षीरसागर यांची माहिती : हृदयशस्त्रक्रिया विभाग होणार मजबूत कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर)मधील हृदयशस्त्रक्रिया विभागासाठी नवीन पदांची निर्मिती करण्यात आली असून त्यानुसार येथे १०५ पदे भरण्यास मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज, शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे त्यांनी सांगितले. क्षीरसागर म्हणाले, ‘सीपीआर’मधील हृदयरोग शस्त्रक्रिया विभाग, हृदयरोग चिकित्सा व रक्तपेढी या विभागांकरिता एकूण ६९ पदे नव्याने निर्माण करून भरण्याबाबत शासनाकडून मंजुरी दिली आहे. जुलै २०१३च्या पावसाळी अधिवेशनामध्ये याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नासंदर्भात तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांनी तातडीने बैठक घेऊन ‘सीपीआर’च्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्याचबरोबर २०१३च्या हिवाळी व मार्च २०१४ च्या अधिवेशनामध्ये आवाज उठविण्यात आला होता. त्याला यश येत वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातर्फे आवश्यक पदनिर्मिती करण्याबाबत ९ एप्रिलला ‘सीपीआर’ प्रशासनाला पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार हृदयरोग शस्त्रक्रिया विभागासाठी २७, हृदयरोग चिकित्सा विभागासाठी २५ व रक्तपेढी विभागासाठी १७ अशी एकूण ६९ पदे नव्याने निर्माण करून भरण्यात येणार आहेत. यामध्ये प्राध्यापक २, सहयोगी प्राध्यापक २, संजीवनशास्त्रज्ञ १, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ६, समाजसेवा अधीक्षक २, परिसेवका ३, अधिपरिचारिका ३०, वरिष्ठ साहाय्यक १, वरिष्ठ लिपिक ३, औषध निर्माता १, प्रयोगशाळा साहाय्यक ६, कनिष्ठ लिपिक २ अशा पदांचा समावेश आहे. या पदांकरिता २ कोटी ७२ लाख २६ हजार आणि बाह्य यंत्रणेद्वारे काम करून घेण्याकरिता ३४ लाख ५६ हजार असे मिळून ३ कोटी ६ लाख ९२ हजार एवढ्या वार्षिक खर्चास मान्यता देण्यात आली आहे. बाह्य यंत्रणेद्वारे काम करण्यात येणार्‍या कामांमध्ये वर्ग क्रमांक ४ च्या कर्मचार्‍यांच्या ३६ पदांची निर्मिती करण्यात आली आहे.

Web Title: 150 posts sanctioned for CPR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.