कोल्हापूरातील १५ हजार जणांनी दिली ‘संयुक्त पूर्व परीक्षा’
By Admin | Updated: July 16, 2017 18:55 IST2017-07-16T18:55:08+5:302017-07-16T18:55:08+5:30
शहरातील ५१ केंद्रे गर्दीने फुलली; विज्ञान, बुद्धिमत्तेला कस लागला

कोल्हापूरातील १५ हजार जणांनी दिली ‘संयुक्त पूर्व परीक्षा’
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) रविवारी शहरातील विविध ५१ केंद्रांवर सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकपदासाठी संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात आली. कोल्हापूरमधील केंद्रांवरून एकूण १५५३४ उमेदवारांनी परीक्षा दिली, तर २२७७ जण गैरहजर राहिले.
‘एमपीएससी’तर्फे सकाळी अकरा ते दुपारी बारा या वेळेत या परीक्षेअंतर्गत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपातील शंभर प्रश्नांचा पेपर घेण्यात आला. यासाठी सकाळी साडेदहा वाजता उमेदवारांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश देण्यात आला. रविवारची सुटी असूनही या परीक्षेमुळे सकाळी साडेनऊ वाजल्यापासून परीक्षा केंद्र असलेल्या महाविद्यालयांचा परिसर गर्दीने फुलून गेला.
कोल्हापूर केंद्रावरून परीक्षेसाठी १७८११ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यांपैकी १५५३४ जणांनी परीक्षा दिली. ‘एमपीएससी’ने सहा वर्षांनंतर यंदा तीन विविध पदांसाठी संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली. कोल्हापुरातील विविध केंद्रांवरील परीक्षेच्या कामकाजासाठी जिल्ह्यातील महसूल विभागामधील १८०० कर्मचारी कार्यरत होते.
दरम्यान, या पूर्वपरीक्षेचा पेपर साधारणत: ६० टक्के सोपा, तर ४० टक्के कठीण होता. विज्ञान, बुद्धिमत्ता आणि गणित विषयांवरील प्रश्न अधिक कठीण होते. ते सोडविताना कस लागला. सामान्यज्ञान, चालू घडामोडींवरील प्रश्न सोपे होते, अशा प्रतिक्रिया परीक्षार्थींनी व्यक्त केल्या.