सभेतील राडाप्रकरणी १५ गुरुजींची कसून चौकशी
By Admin | Updated: September 6, 2015 21:47 IST2015-09-06T21:47:08+5:302015-09-06T21:47:08+5:30
कोल्हापुरातील प्रकरण : शिक्षण समिती बैठकीत कारवाईचा ठराव

सभेतील राडाप्रकरणी १५ गुरुजींची कसून चौकशी
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत राड्यात आघाडीवर असलेल्या १५ गुरुजींची कसून चौकशी झाली आहे. विविध प्रसारमाध्यमांकडील फुटेज, छायाचित्रांवरून या १५ राडेबाजारांना शिक्षण विभागाच्या त्रिसदस्यही समितीने शोध घेतला आहे. राड्यातील आणखी गुरुजींचा शोध सुरू आहे. संपूर्ण अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत राड्यातील गुरुजींवर कारवाई करण्याचा ठराव केला आहे.
शिक्षक बँकेची ७६ वी वार्षिक सर्वसाधारण २३ आॅगस्टला सभा आयर्विन मल्टिपर्पज हॉल येथे आयोजित केली होती. या सभेत सत्तारूढ व विरोधक यांच्यात राडा झाला. यावेळी कपडे फाटेपर्यंत शिक्षकांना मारहाण करण्यात आली. अर्वाच्च शिवीगाळ, खुर्ची, चप्पल यांची फेकाफेकी झाली. कोल्हापूरच्या गुरुजींचा राडा हा राज्यभर चर्चेचा विषय झाला. दरम्यान, सर्वच स्तरांतून टीका झाल्यानंतर प्राथमिक शिक्षण विभागाने तीन सदस्यांची चौकशी समिती नेमली. पहिल्यांदा समिती राड्याची माहिती घेण्यासाठी बँकेत गेली तेथे त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. इतिवृत्ताची प्रत मिळाली नाही. पुन्हा ४ सप्टेंबरला बँकेत जावून चौकशी केली. विविध वृत्तपत्रांत छापून आलेली छायाचित्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमांकडून फुटेज यांच्यातील चेहरे शोधून १५ राडा करणाऱ्या गुरुजींना शोधून जबाब नोंदविले आहे. कारवाईच होऊ नये, यासाठी प्रयत्न करणारे राडेबाज गुरूजी चौकशी सुरू झाल्यामुळे सैरभैर झाले आहेत. गुरुजींच्या पुढाऱ्यांकडून जावून चौकशीचा ससेमिरा चुकविण्याचा प्रयत्न केला आहे परंतु, जिल्हा परिषद पदाधिकारीही राडा केलेल्या गुरुजींवर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका घेतली. त्यामुळे राडा केलेल्या गुरुजी अडचणीत येणार आहेत. (प्रतिनिधी)
राडा प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अहवाल आल्यानंतर दोषीविरुद्ध कारवाईसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्याकडे प्रस्ताव दिला जाईल.
- सुभाष चौगुले,
प्राथमिक शिक्षणाधिकारी