गडहिंग्लज विभागात ‘महावितरण’चे १५ कोटी थकीत..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:59 IST2020-12-05T04:59:46+5:302020-12-05T04:59:46+5:30
राम मगदूम / लोकमत न्यूज नेटवर्क गडहिंग्लज : कोरोनामुळे महावितरणच्या गडहिंग्लज विभागातील गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तीन ...

गडहिंग्लज विभागात ‘महावितरण’चे १५ कोटी थकीत..!
राम मगदूम / लोकमत न्यूज नेटवर्क
गडहिंग्लज : कोरोनामुळे महावितरणच्या गडहिंग्लज विभागातील गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तीन तालुक्यांतील एकूण थकबाकी तब्बल १५ कोटी एक लाख आहे. एकूण एक लाख ३५ हजार ग्राहकांपैकी ४० हजार ७१४ ग्राहकांनी एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत एकही बिल भरलेले नाही. लॉकडाऊनमुळे अनेक छोटे-मोठे उद्योग बंद पडले. व्यावसायिकांना अनेक वेळा आपले व्यवहार बंद ठेवावे लागले. रोजी-रोटी गेल्यामुळे गोरगरीब हवालदिल झाले. त्यामुळे घरफाळा आणि वीज बिल माफीची मागणी सुरू झाली. शेतीच्या कर्जमाफीप्रमाणे वीज बिलदेखील माफ होईल, या आशेने अनेकांनी वीज बिले भरली नाहीत. त्याचा मोठा फटका ‘महावितरण’ला बसला आहे. महावितरणने सरपंच ते आमदारांपर्यंत लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. गावनिहाय मेळावे घेऊन वीज ग्राहकांचे मनपरिवर्तन केले जात आहे. किमान कर्मचाऱ्यांचा पगार, वीजखरेदी आणि दैनंदिन संचलनासाठी रक्कम उभी करण्यासाठी महावितरणची धडपड सुरू आहे.
चौकट
गडहिंग्लज विभागातील सुमारे ४० हजार ग्राहकांनी एप्रिलपासून एकही बिल भरलेले नाही. त्यासाठी ग्राहक संपर्क मोहीम सुरू केली आहे. गाववार मेळावे घेऊन सोयीचे हप्ते पाडून देणे आणि बिले भरून घेण्याची सुविधा केली आहे. त्याचा वीज ग्राहकांनी लाभ घ्यावा.
- संजय पोवार, प्र. कार्यकारी अभियंता, महावितरण- गडहिंग्लज.
* लॉकडाऊन काळातील थकबाकी अशी -
- गडहिंग्लज तालुका - ५ कोटी ८८ लाख
- आजरा तालुका - २ कोटी ७४ लाख
- चंदगड तालुका - ६ कोटी ३८ लाख
------------------------------------------------------