अकरावीत १३७९ जणांची प्रवेश निश्चिती
By Admin | Updated: July 6, 2016 00:14 IST2016-07-05T23:50:26+5:302016-07-06T00:14:26+5:30
तिसरा दिवस : आज प्रक्रियेला सुटी; उद्या अखेरचा दिवस; पावसाने उघडीप दिल्याने गर्दी

अकरावीत १३७९ जणांची प्रवेश निश्चिती
कोल्हापूर : अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील प्रत्यक्ष प्रवेश घेण्याच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी १३७९ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रवेश निश्चिती केली. दिवसभरात पावसाने अधिकतर वेळ उघडीप दिल्याने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
दरम्यान, रमजान ईदनिमित्त आज, बुधवारी प्रवेश प्रक्रियेला सुटी राहणार आहे. उद्या, गुरुवारी प्रत्यक्ष प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू राहणार असून, हा अखेरचा दिवस आहे.
शहरातील विविध ३२ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशासाठी शनिवार (दि. २)पासून प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही सुरू झाली. त्यानंतर मंगळवारी प्रक्रियेच्या तिसऱ्या दिवशी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठी एकूण १३७९ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रवेश निश्चित केले. दिवसभरात पावसाने काहीशी उघडिप दिल्याने प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. सायंकाळी उशिरापर्यंत महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली. प्रवेश प्रक्रियेच्या तक्रार निवारण केंद्रांवर मंगळवारी एकूण १२९ तक्रार दाखल झाल्या. त्यात कला शाखेबाबत दाखल झालेल्या तीन तक्रार मान्य करण्यात आल्या. वाणिज्य शाखेसाठीच्या ३६ तक्रारींचा समावेश होता. त्यातील चार मान्य व ३२ अमान्य करण्यात आल्या. विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक ९० तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यातील दहा मान्य, तर ८० अमान्य झाल्या. गुणवत्ता यादीनुसार महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करण्याचा उद्या, गुरुवारी अखेरचा दिवस आहे. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर महाविद्यालयीन पातळीवर विद्यार्थ्यांना दि. ८ आणि ९ जुलैला प्रवेश दिला जाईल.
दरम्यान, शहरातील सर्व महाविद्यालयांतील अकरावीचे वर्ग दि. ११ जुलैपासून सुरू होतील. (प्रतिनिधी)
‘तंत्रनिकेतन’च्या गुणवत्ता यादीची प्रतीक्षा
शासकीय आणि खासगी तंत्रनिकेतनमधील पदविका अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची मुदत सोमवार (दि. ४)पर्यंत होती. या कालावधीत एकूण ९७९ अर्जांची विक्री, तर ७१४ विद्यार्थ्यांनी अर्जांची निश्चिती केली आहे. अर्ज निश्चिती केलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीच्या प्रसिद्धीची प्रतीक्षा लागली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण संचालनालयाकडून गुणवत्ता यादीच्या प्रसिद्धीची तारीख लवकरच प्रसिद्ध होईल, अशी माहिती शासकीय तंत्रनिकेतनमधील सुविधा केंद्राचे प्रमुख एम. एस. कागवाडे यांनी दिली.
‘कृषी’साठी अर्ज स्वीकृतीची मुदत संपली
कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या कृषी महाविद्यालयांत बारावीनंतर बी. एस्सी. प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेच्या आॅनलाईन प्रवेश अर्ज स्वीकृतीचा मंगळवारी शेवटचा दिवस होता.
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेतर्फे कृषी महाविद्यालयातील बारावीनंतर बी. एस्सी. प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने आॅनलाईन राबविण्यात येत आहे.
६ जूनपासून प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, प्रवेश अर्ज स्वीकृती केंद्राकडे जमा करण्याची मंगळवारी शेवटचा दिवस आहे. अंतरिम गुणवत्ता यादीची प्रसिद्धी १२ जुलैला होणार आहे.