१३३ व्यापाऱ्यांची मालमत्ता जप्त करणार
By Admin | Updated: December 6, 2014 00:43 IST2014-12-06T00:43:59+5:302014-12-06T00:43:59+5:30
कटू कारवाई टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी एलबीटी भरून महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन

१३३ व्यापाऱ्यांची मालमत्ता जप्त करणार
कोल्हापूर : महापालिका एलबीटी विभाग थकबाकीदार व्यापाऱ्यांना नोटिसा बजावून सुनावणी शिबिर घेते. अशाप्रकारच्या नोटीस बजावूनही सुनावणीकडे पाठ फिरविणाऱ्या १३३ व्यापाऱ्यांना पाच हजार दंडाची नोटीस आज, शुक्रवारी महापालिकेने बजावली. दंडासह एलबीटी न भरणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मिळकतींवर बोजा चढवून घरफाळ्याप्रमाणे त्याची वसुली करण्याचे आदेश आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिले आहेत. कटू कारवाई टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी एलबीटी भरून महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने पत्रकाद्वारे केले आहे. महापालिका प्रशासनाने डिसेंबर २०१३पासून एलबीटी भरण्याबाबत वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या शहरातील व्यापाऱ्यांची बँक खाती गोठविण्यास सुरुवात केली. त्यावर्षी १२ व्यापाऱ्यांना महापालिकेने दणका दिल्यानंतर ६० कोटींची वसुली झाली. गेल्या आठ महिन्यांत महापालिकेने ९०६ व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या. मात्र, ३२५ व्यापाऱ्यांनी हजेरी दर्शवून म्हणणे मांडले होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी एलबीटी न भरणाऱ्या ६०० हून अधिक व्यापाऱ्यांची बँक खाती खाती गोठविण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतल्यानंतर एलबीटी भरणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली.
यंदाच्या वर्षी महापालिकेला ८३ कोटी रुपये एलबीटीतून जमा करण्याचे उद्दिष्ट आहे. अद्याप १५ हजार ३०२ व्यापाऱ्यांनी नोंदणी केली. मात्र, दीड हजारांहून अधिक व्यापाऱ्यांनी विवरणपत्रे सादर केलेली नाहीत. सहाशेहून अधिक व्यापाऱ्यांनी एलबीटीकडे पाठ फिरविली. त्यातील ५७ व्यापाऱ्यांची बॅँक खाती सहा महिन्यांसाठी सील करण्यात आली. त्यानंतरही १३३ व्यापाऱ्यांनी एलबीटीकडे पाठ फिरविली. अशा व्यापाऱ्यांना पाच हजार रुपये दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर या व्यापाऱ्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवून एलबीटीची वसुली केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)