१३०० जणांची पेन्शन बंद
By Admin | Updated: November 23, 2015 00:40 IST2015-11-23T00:36:45+5:302015-11-23T00:40:23+5:30
इंदिरा गांधी योजना : मृत, फेरचौकशीतील अपात्रांचा समावेश

१३०० जणांची पेन्शन बंद
प्रवीण देसाई -- कोल्हापूर --राष्ट्रीय सामाजिक साहाय्यता कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी योजनेतील जिल्ह्यातील १३८३ लाभार्थ्यांची पेन्शन जिल्हा प्रशासनाने बंद केली आहे. ‘मृत आणि फेरचौकशीमध्ये अपात्र’ या कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये कोल्हापूर दक्षिण मधील सर्वाधिक ५३२ लाभार्थी आहेत.काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी श्रावणबाळ, इंदिरा गांधी योजना, संजय गांधी योजनेसह विविध योजनांमध्ये जिल्ह्यात १७ हजारांपेक्षा अधिक संभाव्य बोगस लाभार्थी असल्याचे जाहीर करून चौकशीचे आदेश दिले होेते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून स्थानिक पातळीवर लाभार्थ्यांची शहानिशा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यात राष्ट्रीय सामाजिक साहाय्यता कार्यक्रमांतर्गत ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन’ योजनेतील १३८० लाभार्थ्यांची पेन्शन बंद करण्यात आली आहे. यातील १२१० लाभार्थी हे फेरचौकशीमध्ये अपात्र आढळले; तर १७० लाभार्थी मृत आहेत. पेन्शन बंद झालेल्या लाभार्थ्यांमध्ये ५३२ (कोल्हापूर दक्षिण), २५२ (करवीर) , १९६ शिरोळ), १४२ (आजरा), १०४ (पन्हाळा), ९५ (राधानगरी) , ४३ (गडहिंग्लज), १३ (चंदगड) तर २ शाहूवाडी व १ इलकरजीतील आहे. त्याचबरोबर ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजने’तील तीन लाभार्थ्यांची पेन्शन बंद करण्यात आली असून, ते राधानगरी तालुक्यातील आहेत.