पुणे विभागातील १३० अधिकारी जाळ्यात!
By Admin | Updated: July 9, 2015 21:32 IST2015-07-09T21:32:55+5:302015-07-09T21:32:55+5:30
शिरीष देशपांडे : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी चौकशी सुरू

पुणे विभागातील १३० अधिकारी जाळ्यात!
सांगली : महसूल, महापालिका, पोलीस, आरटीओ, पाटबंधारे यांसह अन्य शासकीय कार्यालयांतील पुणे विभागातील सुमारे १३० अधिकारी बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक
विभागाच्या चौकशीच्या जाळ्यात अडकले आहेत, अशी माहिती या विभागाचे अधीक्षक शिरीष देशपांडे यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिली. या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असेही देशपांडे यांनी सांगितले.
देशपांडे यांची मे २०१५ मध्ये ‘लाचलुचपत प्रतिबंधक’च्या नांदेड विभागातून पुणे विभागात बदली झाली आहे. अधीक्षक पदाची सूत्रे घेतल्यानंतर देशपांडे पहिल्यांदाच गुरुवारी सांगलीत आले होते. पोलीस उपअधीक्षक प्रदीप आफळे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले की, भ्रष्टाचाराविरुद्ध लोकांमध्ये चांगली जागरूकता निर्माण झाली आहे. यातून तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. जानेवारी ते जून २०१५ या सहा महिन्यांत पुणे विभागात १२६ जणांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. गतवर्षी ही संख्या १०२ होती. यामध्ये पुणे ४८, सातारा १७, सांगली १९, सोलापूर २७ व कोल्हापूर १६ अशी कारवाईची आकडेवारी आहे. यातील सर्वाधिक प्रकरणे महसूल विभागाची आहेत.
देशपांडे म्हणाले की, लाच घेताना सापडलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यामधील साक्षीदारांवर लक्ष ठेवून आहोत. जुन्या प्रकरणांची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पोलीस दलातील जे वरिष्ठ अधिकारी लाच घेताना सापडले होते, त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यास पोलीस महासंचालकांनी परवानगी नाकारली आहे.
याविरुद्ध आम्ही राज्याच्या गृह विभागाच्या मुख्य सचिवांकडे अपील केले आहे. लाच घेणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पकडण्याच्या कारवाईत वाढ होत असताना, बहिशेबी मालमत्ता जमविणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्धही तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. पुणे विभागातील १३० अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. यामध्ये गोपनीय ७० व उघड ६० चौकशी प्रकरणांचा समावेश आहे.