हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये १३ गावेच ठरणार निर्णायक

By Admin | Updated: October 9, 2014 23:07 IST2014-10-09T21:41:01+5:302014-10-09T23:07:34+5:30

अस्तित्वाची लढाई : मतविभागणी धक्कादायक निकाल देण्याची शक्यता

13 villages in Hatkanangale assembly constituency will be decisive | हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये १३ गावेच ठरणार निर्णायक

हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये १३ गावेच ठरणार निर्णायक

दत्ता बिडकर - हातकणंगले  विधानसभा मतदारसंघामध्ये कॉँग्रेस, शिवसेना, जनसुराज्य आणि स्वाभिमानीकडून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. आरोप- प्रत्यारोपच्या फैरी झडत आहेत. बहुरंगी लढतीमुळे मतांची विभागणी प्रस्थापितांना धक्का देण्याची शक्यता आहे. इचलकरंजी मतदारसंघातील गतवेळी समाविष्ट झालेली १३ गावे याहीवेळी निर्णायक ठरणार आहेत. गटा-तटाचे राजकारण उफाळून आले असून आघाडीची बिघाडी आणि युतीचा काडीमोड यामुळे पक्षापेक्षा व्यक्तिनिष्ठ राजकारण जोरात आहे. प्रचाराची हायटेक यंत्रणा, गाठीभेटी, पदयात्रा आणि कोपरासभामुळे प्रचार शिगेला पोहोचला आहे.
हातकणंगले तालुका पूर्वीपासूनच कॉँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. २००४ आणि २००९ च्या निवडणुकीमध्ये या तालुक्यात कॉँग्रेसनेच कॉँग्रेसचा पराभव केल्याचे चित्र आहे. राज्यात आघाडीची बिघाडी आणि महायुतीच्या काडीमोडामुळे समीकरणे बदलली आहेत. गत दोनवेळा कॉँग्रेसचा पराभव झाला. त्यावेळी स्वकियाबरोबर राष्ट्रवादीकडे संशयाने बघण्याच्या प्रकाराने कॉँग्रेसचे नेते एकमेकांच्या काटा काढण्याच्या पद्धतीने अस्तित्व संपून बसले होते. यावेळी कॉँग्रेस व राष्ट्रवादी वेगवेगळी लढत असल्यामुळे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी नेते, कार्यकर्ते कामाला लागले आहेत. कॉँग्रेसचे जयवंतराव आवळे यांच्यासाठी पक्षांतर्गत सर्व मतभेद बाजूला ठेवून प्रकाश आवाडे गट आणि आमदार महादेवराव महाडिक गट एकदिलाने कामाला लागला आहे.
शिवसेनेच्या डॉ. सुजित मिणचेकर यांनी गतवेळी २००४ मतानी विजय मिळवून या मतदारसंघावर सर्वप्रथम भगवा फडकविण्याचे काम केले. गेल्या पाच वर्षांत ७० कोटींची विकासकामे केल्याचा दावा ते करत आहेत. फिरत्या वाहनावर एल.ई.डी चित्रफीत दाखवून आपल्या कामाचा पाठपुरावा ते मतदारांसमोर मांडत आहेत. मात्र कॉँग्रेस आणि जनसुराज्यकडून त्यांना ‘टार्गेट’ केले जात आहे. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे आघाडी सरकारमुळे मतदारसंघात विकास झाला आहे. आमदार फंड आठ कोटी असताना ७० कोटींची कामे मिणचेकर यांनी कोठून केली, तर जनसुराज्यचे राजीव आवळे यांनी थेट मिणचेकराच्यांवर आरोप करताना गाणी म्हणून मतदारसंघाचा विकास होत नसल्याचे स्पष्ट केले आहे. कॉँग्रेसच्या जयवंतराव आवळे यांनी आ. मिणचेकरांचे कार्यालय म्हणजे जमीन-खरेदी विक्री एजंटाचा अड्डा असल्याचे आरोप केले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हातकणंगले मतदार- संघात खा. राजू शेट्टी यांना ४८ हजार मताधिक्य मिळाले आहे. विधानसभेलाही साथ मिळेल यासाठी सदाभाऊ खोत मतदारसंघात दौरे करत आहेत.
वारणा पट्ट्यात जनसुराज्यकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. कॉँग्रेस-शिवसेनेने सर्वच गावावर आपली यंत्रणा गतिमान केली आहे. स्वाभिमानीची भिस्त शेतकरीवर्गावर आहे, तर राष्ट्रवादी प्रचारातही दिसत नाही, अशी स्थिती आहे. इचलकरंजी मतदारसंघातील गतवेळी १३ गावांच्या समावेशामुळे मतदारसंघाचे गणित बिघडले होते. या १३ गावांवरच सर्व पक्षांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. सर्वच पक्ष स्वबळावर लढत असल्याने ही निवडणूक लक्षवेधी आणि सर्वच पक्षांची स्वत:ची ताकद समजणारी ठरणार आहे.

हातकणंगले
एकूण मतदार
३,0२,२९१
प्रचारातील मुद्दे
दलित आणि बौद्ध समाजातील नाराजी, स्थानिक उमेदवाराचा अभाव आणि विकासकामाबाबत आरोप-प्रत्यारोप
महानगरपालिकामध्ये गावाचा समावेश आणि गावे वगळल्याचे राजकारण
कॉँग्रेसच्या तीन नेत्यांची एकवटलेली ताकद आणि राष्ट्रवादीच्या माजी खा. निवेदिता माने गटाची गुलदस्त्यातील भूमिका
रखडलेले तालुका क्रीडा संकुल आणि शासकीय इमारतीचे काम
हातकणंगले तालुक्याचे गाव आणि चंदेरीनगरी हुपरीचे रखडलेले
नगरपरिषदाचे प्रस्ताव

Web Title: 13 villages in Hatkanangale assembly constituency will be decisive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.