गुन्हे दाखल करून १३ जणांना अटक

By Admin | Updated: August 23, 2015 00:35 IST2015-08-23T00:31:37+5:302015-08-23T00:35:20+5:30

उत्पादन शुल्क अधिकारी मारहाण : खारेपाटण येथील प्रकाराने खळबळ

13 people arrested in the crime and arrested | गुन्हे दाखल करून १३ जणांना अटक

गुन्हे दाखल करून १३ जणांना अटक

कणकवली/खारेपाटण : खारेपाटणनजीक उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांकडून मारहाण झाल्यानंतर मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्या अधिकाऱ्यांना कणकवली पोलीस स्थानकात आणले. त्यावेळी अधिकाऱ्यांवर तक्रार दाखल करण्याच्या मागणीसाठी खारेपाटणवासीय ग्रामस्थही स्थानकात आले. त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर कोणतीही तक्रार दाखल न करता प्रकरण सामंजस्याने मिटविण्यात आले. काही वेळातच जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून आलेल्या आदेशानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रार नोंदवली. त्यानुसार गुन्हे दाखल करून खारेपाटण येथील तेरा जणांना अटक करण्यात आली.
उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पोलिसांनी खारेपाटण येथे संचलन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मजा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १०० दंगल नियंत्रक पथकाच्या पोलिसांनी संचलन केले.
रिक्षात दारू नाही
लवू रामचंद्र तेली रिक्षा (एम.एच.-०७-सी-४७४२) घेऊन तळेरेहून खारेपाटणच्या दिशेने येत होता. त्याच्यासमवेत किरण भीमाप्पा बेळगे, गणेश दत्तात्रय झगडे, दैवत अंकूश शेट्ये हे होते. उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी दारू वाहतूक करत असल्याच्या संशयावरून अडविलेल्या या रिक्षात दारू आढळली नसल्याचे कणकवलीचे पोलीस निरीक्षक सुनील मोरे यांनी सांगितले.
मद्यपान केलेले नाही
मारहाण झालेल्या अधिकाऱ्यांनी मद्यपान केलेले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तिघांनाही कणकवली येथे उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्यांची तपासणी करण्यात आली असता मद्यपान केलेले नसल्याचे स्पष्ट झाले असे पोलीस निरीक्षक सुनील मोरे यांनी सांगितले.
तोच ‘दबंग’ अधिकारी
उत्पादन शुल्कचे निरीक्षक प्रमोद कांबळे यांनी महिनाभरापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील हातिवले येथे बेकायदा दारू वाहतुकीविरोधात कारवाई करताना गोळीबार केला होता. संबंधित प्रकरणाचा राग मनात ठेवत ही मारहाण झाली असावी, असे बोलले जात आहे.
रिक्षाची काच फोडली
पाठलाग करताना रिक्षा अडविण्याचा प्रयत्न उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी केला. या प्रयत्नात रिक्षावर दांडा मारल्याने मागील काच फुटली.
अधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळपासूनच पोलीस पथके व्हॅनमधून खारेपाटण येथे दाखल होण्यास सुरूवात झाली. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास खारेपाटण बाजारपेठेतून पोलिसांनी संचलन केले. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगत खारेपाटणवासीयांनी नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: 13 people arrested in the crime and arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.