शाहू वस्तुसंग्रहालयासाठी १२.४३ कोटींचा आराखडा
By Admin | Updated: July 11, 2015 01:37 IST2015-07-11T01:37:53+5:302015-07-11T01:37:53+5:30
जन्मस्थळी होणार संग्रहालय : अनावश्यक बांधकाम काढून घेणार

शाहू वस्तुसंग्रहालयासाठी १२.४३ कोटींचा आराखडा
कोल्हापूर : येथील कसबा बावडा परिसरातील शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी तयार करण्यात येणाऱ्या वस्तुसंग्रहालयाचा १२ कोटी ४३ लाख रुपयांचा उपसमितीने तयार केलेला आराखडा शुक्रवारी लक्ष्मी-विलास पॅलेस जतन व विकास समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. अध्यक्षस्थानी समितीचे कार्यकारी अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी होते. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्यासह समिती सदस्यांच्या उपस्थितीत शाहू जन्मस्थळी ही बैठक सायंकाळी सुमारे दीड तास झाली. हा आराखडा आणखी सुमारे दीड कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. वाढीव आराखडा पुरातत्त्व विभागाच्या संचालकांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल व त्यांच्या मंजुरीनंतर शासनाकडे निधी मंजुरीसाठी प्रयत्न करण्याचा निर्णय बैठकीत झाला. शाहू जयंतीदिनी जन्मस्थळ विकासकाम चांगल्या दर्जाचे झाले नसल्याची तक्रार समितीच्या सदस्यांनी केल्यावर लगेच २७ जूनला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बैठक बोलावली होती.
त्या बैठकीत जन्मस्थळाचा विकास करण्यासाठी दोन स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात आल्या. त्यावेळी वस्तुसंग्रहालय उपसमितीस आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. डॉ. पवार हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीने हा आराखडा तयार केला. त्यावर चर्चा व काही सूचना करून त्यास मंजुरी देण्यात आली.
जन्मस्थळाच्या ठिकाणी जे अनावश्यक बांधकाम झाले आहे ते काढून घेण्यात येणार आहे. बैठकीस वस्तुसंग्रहालय उपसमितीचे सदस्य इतिहास संशोधक वसंतराव मोरे, डॉ. रमेश जाधव, इंद्रजित सावंत, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, वास्तुविशारद अमरजा निंबाळकर, कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाचे सहायक अभिरक्षक अमृत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील. सदस्य सचिव : पुरातत्त्वचे सहायक संचालक व्ही. एन. कांबळे, समितीचे सदस्य सचिव व औरंगाबादच्या प्रादेशिक वस्तुसंग्रहालयाचे सहायक अभिरक्षक उदय सुर्वे आदी उपस्थित होते.
साक्षात शाहू महाराज...
राजर्षी शाहू महाराज प्रिन्स आॅफ वेल्सच्या राज्यारोहण सोहळ््यास लंडनला गेल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. शाहू महाराज
समोरून चालत येत असल्याचे त्या चित्रफितीत स्पष्टपणे दिसते.
त्यामुळे त्या चित्रफिती उपलब्ध करण्यासाठी खास प्रयत्न करण्याचे यावेळी ठरले.
बांधकाम करताना दक्षता
शाहू जन्मस्थळ हे राज्य संरक्षित स्मारक आहे. त्यामुळे त्याच्या आजूबाजूला होणारी बांधकामे ही या स्मारकाशी साधर्म्य असणारीच हवीत. तिथे मोठ्या इमारती होऊ नयेत याची काळजी घेतली जावी, असे पत्र महापालिकेला देण्यात येणार आहे.
संशोधन केंद्र
राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनकार्याविषयीची माहिती देणारी कागदपत्रे कोल्हापूर, पुणे, मुंबई आदी विखुरलेल्या ठिकाणी आहेत. शाहूंचे निधन झाल्यावर प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेला ‘सर्च लाईट विझला’ हा अग्रलेख सध्या पुण्यात आहे. ही सगळी कागदपत्रे शाहूप्रेमी जनतेला आणि अभ्यासकांनाही पाहता यावीत यासाठी संशोधन केंद्र करण्यात येणार आहे.
हिशेब लोकांना देणार
शाहू जन्मस्थळाच्या सगळ््या कामांसाठी आजपर्यंत शासनाकडून नेमका किती निधी मिळाला व तो कोणत्या कामासाठी खर्च झाला याबद्दलची पारदर्शकता बाळगणे आवश्यक आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व पुरातत्व विभागाने या खर्चाची तपशीलवार माहिती द्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी दिले. (प्रतिनिधी)
‘अक्षरधाम’च्या धर्तीवर लाईट योजना
‘अक्षरधाम’च्या धर्तीवर संगीत व आकर्षक विद्युत रोषणाई असणारा ‘अॅनेमिटक रोबोटिक शो’ कायमस्वरूपी दाखविण्याची सोय येथे होणार आहे.