जिल्ह्यातील १२,१६६ गर्भवती अशक्त
By Admin | Updated: April 13, 2015 00:01 IST2015-04-12T23:39:59+5:302015-04-13T00:01:37+5:30
आरोग्य तपासणी अभियान : २८४ गर्भवतींचे हिमोग्लोबिन सातपेक्षा कमी, लोहयुक्त गोळ्यांचा डोस

जिल्ह्यातील १२,१६६ गर्भवती अशक्त
भीमगोंडा देसाई- कोल्हापूर - आरोग्य विभागाने महिला आरोग्य तपासणी अभियानात केलेल्या ३० वर्षांवरील महिलांच्या तपासणीत जिल्ह्यातील १२ हजार १६६ गर्भवती अशक्त असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय २८४ गर्भवती अतिअशक्त असल्याचे पुढे आले आहे. सधन समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील गर्भवतींच्या आरोग्याची ही परिस्थिती चिंताजनक मानली जात आहे.
जिल्ह्यातील शासकीयरुग्णालय, प्राथमिक व उपकेंद्राच्या माध्यमातून गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकूण १५ हजार ५१ गर्भवतींची तपासणी झाली. त्यातील १२ हजार १६६ गर्भवतींचे हिमोग्लोबिन ११ ग्रॅमपेक्षा कमी आणि २८४ गर्भवतींचे सात ग्रॅमपेक्षा कमी आहे. सातपेक्षा कमी हिमोग्लोबिन असलेल्या गर्भवतींना आरोग्य विभागाने जोखमीचे ठरविले आहे.
गर्भवती महिलेस स्वत: व बाळाच्या सुदृढतेसाठी परिपूर्ण आहाराची आवश्यकता असते. त्यामुळे आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ११ ग्रॅमपेक्षा कमी हिमोग्लोबिन असलेल्या गर्भवतींना गर्भधारणेपासून तीन महिन्यांनंतर १०० दिवस दोन याप्रमाणे आणि ११ पेक्षा अधिक असलेल्या गर्भवतींना लोहयुक्त गोळ्या मोफत दिल्या जातात. मात्र, ग्रामीण भागातील बहुतांश गर्भवती सकस आहाराबाबत अनभिज्ञ असतात. अल्पशिक्षित असल्यामुळे आरोग्याबाबत त्या फारशा सतर्क राहत नाहीत. त्यामुळे गर्भधारणेच्या अवस्थेत परिपूर्ण आहार आणि लोहयुक्त गोळ्याकडे त्या दुर्लक्ष करतात. परिणामी त्या अशक्त होतात.
हिमोग्लोबिनचे प्रमाण ११ पेक्षा कमी येते. बाळाची वाढ चांगली होत नाही. संबंधित गर्भवतीची प्रकृती खालावते. परिणामी प्रसूतीवेळी ती महिला किंवा बाळ यांंच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आरोग्य प्रशासन, आरोग्य सेविका, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका यांच्यातर्फे गर्भवतींचा नियमित सर्व्हे करून समुपदेशन व लोहयुक्त गोळ्या पुरविल्या जात आहेत. आरोग्य तपासणीनंतर नेमकेपणाने अशक्त गर्भवतींची संख्या समोर आल्यामुळे आरोग्य विभागाने त्वरित व्यापक उपाययोजनांचे नियोजन केले आहे.
जिल्ह्यातील आकडेवारी..
तालुकातपासणी११ ग्रॅमपेक्षा कमी सात ग्रॅमपेक्षा
केलेल्या गर्भवतीहिमोग्लोबिनकमी हिमोग्लोबिन
आजरा९४९९३०१९
भुदरगड५०६४१६११
चंदगड१६२७१५९७३०
गडहिंग्लज७३२७१७१५
गगनबावडा२५८२८७१२
हातकणगंले१७९२१२७९२०
करवीर१८९५१६६१४
कागल१०३७१०११२६
पन्हाळा१३४१११२५२०
राधानगरी९३१९००११
शाहूवाडी९८४७२३९
शिरोळ२९९९१५२०१२
हिमोग्लोबिन ११ ग्रॅमपेक्षा कमी असलेल्या गर्भवतींना रोज दोन लोहयुक्त गोळ्या दिल्या जात आहेत. सातपेक्षा कमी हिमोग्लोबिन असलेल्या गर्भवतींना शिरेतून लोहाचा डोस दिला जात आहे.
- डॉ. आर. एस. आडकेकर,
जिल्हा आरोग्य अधिकारी.