१२0 युवकांनी केले मुंडण
By Admin | Updated: July 29, 2014 23:02 IST2014-07-29T21:30:10+5:302014-07-29T23:02:35+5:30
धनगर समाज आरक्षण : जिल्हाधिकाऱ्यांना देणार काठी अन् घोंगडी

१२0 युवकांनी केले मुंडण
सातारा : धनगर समाज अनुसूचित जमाती प्रवर्गात सामील असतानाही राज्य शासनाच्या जाणीवपूर्वक वेळकाढूपणामुळे आणि चुकीच्या धोरणामुळे अनुसूचित (एसटी) संवर्गात सामील होऊ शकलेला नाही. त्याच्या निषेधार्थ अहिल्या सामाजिक विकास संस्थेच्या १२0 हून अधिक युवक पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक मुंडण करत शासनाचा निषेध केला. दरम्यान, संस्थेने हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी गांधीगिरी मार्गाने जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांना भेटणार असून यावेळी ते काठी आणि घोंगडी भेट देण्यात येणार आहेत. दरम्यान, अहिल्या सामाजिक विकास संस्थेचा मंगळवारी उपोषणाचा चौथा दिवस होता. या दिवशी सामुहिक मुंडण होणार असल्यामुळे असंख्य कार्यकर्ते येथे जमले होते. त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सामुहिक मुंडन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्याबरोबरच शासनाचा निषेधही व्यक्त करण्यात आला. अहिल्या सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष मारुती जानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारपासून हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असून जिल्हाधिकाऱ्यांना काठी आणि घोंगडी भेट देण्यात येणार आहे. सामुहिक मुंडण आंदोलनात बजरंग अवकिटकर, सदानंद माने, रमेश अवकिटकर, शामराव कोळपे, विकास कोकरे, संतोष माने, सुरज कोळपे, अमर कोळपे, संतोष शेलारे, दिनेश माळवदे आदी सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)
आंदोलनस्थळी बंदोबस्त नाही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोणतेही आंदोलन असलेतरी तेथे पोलीस बंदोबस्त देण्यात येतो. मात्र, अहिल्या सामाजिक विकास संस्थेच्या आंदोलनस्थळी कोणत्याही प्रकारचा बंदोबस्त अथवा आरोग्य सुविधा पुरविण्यात आली नसल्याची तक्रार आंदोलकांनी केली आहे.