शिवाजी तरुण मंडळाचा १२ फुटी पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2017 00:47 IST2017-02-17T00:47:03+5:302017-02-17T00:47:03+5:30

आज स्वागत मिरवणूक : शिवजयंती मिरवणुकीत हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

12-foot statue of Shivaji Tarun Mandal | शिवाजी तरुण मंडळाचा १२ फुटी पुतळा

शिवाजी तरुण मंडळाचा १२ फुटी पुतळा

कोल्हापूर : रविवारी (दि. १९) साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीला शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा १२ फूट उंचीचा फायबरचा अश्वारूढ बहुरंगी पुतळा प्रतिष्ठापित करण्यात येणार आहे. आज, शुक्रवारी या पुतळ्याची स्वागत मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण व कार्याध्यक्ष सचिन चव्हाण यांनी गुरुवारी दिली.
ते म्हणाले, शिये येथील संताजी चौगुले यांनी हा पुतळा घडविला असून तो हुबेहूब शिवाजी विद्यापीठातील पुतळ्याची प्रतिकृती आहे. मात्र, तो बहुरंगी असणार असून, हा भारतातील एकमेव पुतळा आहे. त्यासाठी १ लाख ५१ हजार रुपये इतका खर्च आला आहे. आज, शुक्रवारी सकाळी १० वाजता दसरा चौक येथे खासदार संभाजीराजे यांच्या उपस्थितीत पुतळ्याचे पूजन होणार आहे. त्यानंतर महापौर हसिना फरास यांच्या हस्ते मोटारसायकलीच्या रॅलीचे उद्घाटन होईल. संध्याकाळी सहा वाजता उभा मारुती चौक येथे उभारण्यात आलेल्या पॅलेस देखाव्याचे उद्घाटन अरुण पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी नाशिकचे यशवंत गोसावी यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज व आजचा समाज’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
शनिवारी (दि. १८) सकाळी ११ वाजता नागरिकांसाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबिर होणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता शिवाजी पेठेतील सर्व तालीम संस्था, क्लब, पदाधिकारी कार्यकर्ते यांचा प्रा. भरत खराटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
रविवारी (दि. १९) सकाळी साडेआठ वाजता पन्हाळा येथून आणण्यात येणाऱ्या शिवज्योतीचे अर्धा शिवाजी पुतळा येथे स्वागत करण्यात येईल. सकाळी १० वाजून १० मिनिटांनी उभा मारुती चौकात शिवाजी महाराजांचा जन्मकाळ सोहळा होईल. सायंकाळी पाच वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते भव्य मिरवणूक सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. मिरवणूक मार्गावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी तसेच आतषबाजी होणार आहे. मिरवणुकीत उंट, घोडे यांच्यासह प्रबोधनपर फलकांचा समावेश असणार आहे. उपाध्यक्ष अजित राऊत, महेश जाधव, सुरेश जरग, सदाभाऊ शिर्के, अ‍ॅड. अशोकराव साळोखे, चंद्रकांत यादव, लालासाहेब गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.



शांतता आणि शिस्तीचे आवाहन
शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणारी ही स्वागत मिरवणूक क्रांती मोर्चाप्रमाणेच शिस्तबद्ध आणि शांततेत काढण्यात येणार आहे. त्यात सहभागी होणाऱ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांनी कर्णकर्कश हॉर्न न वाजविता आणि गाड्यांचे सायलेन्सर न काढता या शिस्तीचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ही मिरवणूक दसरा चौक, राजाराम महाराज पुतळा, गोकुळ हॉटेल, शाहूपुरी, शहाजी लॉ कॉलेज, राजारामपुरी मेन रोड, हनुमान मंदिर, शाहू मिल चौक, पार्वती मल्टिप्लेक्स, उमा टॉकीज, कॉमर्स कॉलेज, बिंदू चौक, देवल क्लब, मिरजकर तिकटी,पाण्याचा खजिना, हिंद तरुण मंडळ, लाड चौक, खरी कॉर्नर, गांधी मैदान, अर्धा शिवाजी पुतळामार्गे उभा मारुती चौकात येऊन मिरवणुकीचा समारोप होईल.

Web Title: 12-foot statue of Shivaji Tarun Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.