खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिर संवर्धनासाठी १२ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:25 IST2021-03-09T04:25:29+5:302021-03-09T04:25:29+5:30
जयसिंगपूर : सोमवारी झालेल्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये प्राचीन मंदिराचे जतन व संवर्धन करण्यासाठी मोठी तरतूद करण्यात आली. यामध्ये शिरोळ ...

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिर संवर्धनासाठी १२ कोटी
जयसिंगपूर : सोमवारी झालेल्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये प्राचीन मंदिराचे जतन व संवर्धन करण्यासाठी मोठी तरतूद करण्यात आली. यामध्ये शिरोळ तालुक्यातील खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरासाठी १२ कोटींचा निधी मिळणार आहे. त्यामुळे खिद्रापूरचा चेहरामोहरा बदलणार असून, हे मंदिर पर्यटन स्थळावर येणार आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी फटाके वाजवून महाविकास आघाडी सरकारचे स्वागत केले.
भारतीय प्राचीन संस्कृती, कला, शिल्पकला यांचे दर्शन घडविणाऱ्या कोपेश्वर मंदिराकडे यापूर्वी भारतीय पुरातन खात्याने लक्ष दिले होते. पर्यटकांना तंतोतंत मार्गदर्शन व माहिती मिळावी, यासाठी सांस्कृतिक भवन, गार्डन व पार्किंगची सोय यासाठी दहा वर्षांपूर्वी निधी मिळाला होता. मात्र, त्यानंतर हे प्राचीन मंदिर दुर्लक्षितच राहिले. कोपेश्वर मंदिर वास्तुशास्त्र व शिल्पकला यांचा मनोहर संगम आहे. दीड हजार वर्षांपूर्वीच्या शिल्पकलेची साक्ष देत हे मंदिर आजही उभे आहे. मंदिरातील गाभारा, नंदी असलेला सभामंडप, स्वर्गमंडप, अप्रतिम शिल्प, शिलालेख, दंतकथा, निसर्ग मंदिराची प्राचीनता, कलाकुसर असा प्राचीन संस्कृतीचा एक अनमोल ठेवाच याठिकाणी पाहायला मिळतो. हे मंदिर पर्यटकांच्या आकर्षणाचे आणखी केंद्रबिंदू ठरण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने मंदिराच्या जतन व संवर्धनासाठी सुमारे १२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या निधीतून खिद्रापूरचा चेहरामोहरा बदलणार असून तालुक्याच्या वैभवात आणखी भर पडणार आहे.
.....
कोट -
भारतीय प्राचीन संस्कृती, कला, शिल्पकला याचे दर्शन घडविणाऱ्या कोपेश्वर मंदिराच्या संवर्धनासाठी निधी मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू होता. अर्थसंकल्पात १२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आरोग्य राज्यमंत्री
फोटो - ०८०३२०२१-जेएवाय-०८-कोपेश्वर मंदिर खिद्रापूर