विनाअनुदानित शाळांचे ११ ला आंदोलन
By Admin | Updated: December 2, 2014 00:21 IST2014-12-01T23:06:37+5:302014-12-02T00:21:31+5:30
पुनर्मूल्यांकनाला विरोध : शिक्षकांच्या बैठकीत झाला निर्णय

विनाअनुदानित शाळांचे ११ ला आंदोलन
जयसिंगपूर : कायम विनाअनुदानित शाळेच्या पुनर्मूल्यांकनाचा डाव शासन आखत असून, त्याला विरोध करण्यासाठी नागपूर अधिवेशनात ११ डिसेंबरला आंदोलन करण्याचा निर्णय कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने घेण्यात आला. येथील ज्ञानगंगा हायस्कूलमध्ये झालेल्या शिरोळ तालुक्यातील विनाअनुदानित शिक्षकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे म्हणाले, नव्याने निवडून आलेले शासन हे शिक्षकांना देशोधडीला लावण्याचा निर्णय घेत असून, सत्तेत येण्यापूर्वी शिक्षकांचा प्रश्न सोडविण्याचा शब्द दिला होता; मात्र तो आता पाळत नसल्याचे दिसत आहे. मंत्री विनोद तावडे शिष्टमंडळासमोर बोलतात एक आणि प्रत्यक्षात करतात वेगळेच. याशिवाय मूल्यांकन झालेल्या शाळेची अनुदानाची फाईल नियोजन समितीत गेली होती मात्र, त्या फाईलवर या शाळांना १२ कोटी रुपयांसाठी महाराष्ट्राची साधनसंपत्ती तोकडी असल्याचा शेरा मारून पुन्हा शिक्षण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. शपथविधीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या शासनाला वठणीवर आणण्यासाठी आंदोलनाची आवश्यकता असून, यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
प्रारंभी स्वागत अमर पाटील यांनी, तर प्रास्ताविक चिंचवाड हायस्कूलचे मुख्याध्यापक जाधव यांनी केले. यावेळी उमळवाड हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. एस. चावरे यांच्यासह तालुक्यातील विदाअनुदानित शाळांचे शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)