राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ११७४ खटले निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:39 IST2020-12-13T04:39:22+5:302020-12-13T04:39:22+5:30
कोल्हापूर : जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी जिल्हाभर आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये १२ हजार ६२५ दाखलपूर्व प्रकरणांपैकी सुमारे ...

राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ११७४ खटले निकाली
कोल्हापूर : जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी जिल्हाभर आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये १२ हजार ६२५ दाखलपूर्व प्रकरणांपैकी सुमारे ११७४ खटले तडजोडीने मिटवण्यात यश आले. त्यामध्ये १० कोटी १९ लाख ४३ हजारांची रक्कम भरपाई म्हणून दिली. बँक वसुली, कामगार वाद, वीज, पाणी प्रकरणे अशी ही प्रकरणे होती. शिवाय ३३ कौटुंबिक वादाची प्रकरणे मिटवून त्यांचे संसार पुन्हा जुळविण्यात यश आले.
न्यायालयात प्रलंबित नसलेल्या दाखलपूर्व प्रकरणी तडजोडीतून मिटविण्याच्या हेतूने या लोक अदालतीचे आयोजन करण्यात येते. शनिवारी सकाळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने लोक अदालतीचा प्रारंभ झाला. जिल्हा न्यायाधीश बी. डी. शेळके यावेळी उपस्थित होते. दिवाणी न्यायालये, औद्योगिक व कामगार न्यायालये, कौटुंबिक न्यायालयासह सर्व न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन केले होते. विधि सेवा प्राधिकरणच्या १३ समिती, ३९ पॅनेलद्वारे हे कामकाज सुरू होते.
कौटुंबिक वादातील ३३ खटल्यांत यशस्वी मध्यस्थी करून दिलजमाई झाली. सहकार कायद्यासंबंधी १२ खटले, कामगार न्यायालयाचा एक खटला मिटविला. दस्तऐवज कायदा कलम १३८ प्रमाणे आलेले ३४७ खटलेही तडजोडीने मिटविण्यात आले. प्रलंबित ५६८ व दाखलपूर्व ६०६ असे एकूण ११७४ खटले मिटवून त्यामध्ये १० कोटी १९ लाख ४३ हजारांची रक्कम मंजूर करण्यात आल्याची माहिती विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे यांनी दिली. विधि सेवाचे अधीक्षक आर. जी. मानेही यावेळी प्रमुख उपस्थित होते.
फोटो नं. १२१२२०२०-कोल-लोकअदालत
ओळ : जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या वतीने कोल्हापुरात शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी जिल्हा न्यायाधीश बी. डी. शेळके, सचिव पंकज देशपांडे, आर.जी. माने, आदी उपस्थित होते.
(तानाजी)