विकासकामांवर १,१५९ कोटी खर्च

By Admin | Updated: August 17, 2014 00:54 IST2014-08-17T00:48:38+5:302014-08-17T00:54:20+5:30

पालकमंत्री : गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट निधी आणल्याचा दावा

1,159 crore expenditure on development works | विकासकामांवर १,१५९ कोटी खर्च

विकासकामांवर १,१५९ कोटी खर्च

कोल्हापूर : गेल्या चार वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यातील विकासकामांवर १,१५९ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काल, शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. २००४ ते २००९ च्या तुलनेत कोल्हापूरसाठी दुप्पट निधी आणल्याचा दावाही त्यांनी केला.
राज्य सरकार जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देत असते. २०१० पासून २०१४ पर्यंत पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यासाठी १,१५९ कोटींचा निधी सरकारकडून आणला. यंदा २०१४ च्या जिल्हा नियोजन मंडळाने केलेल्या नियोजन व आराखड्यानुसार २८९ कोटींचा निधी प्राप्त झाला असून, त्यापैकी ४२ टक्के निधी खर्च होईल अशी कामे सुरू करण्याचे आदेश दिलेत. आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच ही कामे सुरू झालेली असतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
शाहू स्मारकाचा आराखडा तयार
शाहू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या राजर्षी शाहू स्मारकाचा १६९ कोटींचा आराखडा तयार झाला असून, त्याचे सादरीकरण मी व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाहिले. त्यात काही सुधारणा आहेत. त्या केल्यानंतर महानगरपालिका सभेत आराखडा मंजूर केला जाईल. या स्मारकाला आता गती मिळाली आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
क्रीडा संकुलाची कामे सुरू होतील
क्रीडा संकुलाचे काम रखडल्याकडे लक्ष वेधले असता त्यांनी सांगितले की, काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे हे काम रखडले. काही निविदा रद्द करून नव्याने काढल्या, परंतु आता अडचणी दूर झाल्या. कामे पुन्हा सुरू होतील. शाहू जन्मस्थळाच्या कामातही अशाच अडचणी आल्या होत्या. पुरातत्व विभागाने काम करावे की सार्वजनिक बांधकाम विभागाने यात हे काम रखडले, परंतु हाही विषय संपुष्टात आला आहे.
शेवटचीच बैठक
निवडणूक जाहीर होत असल्याने आज पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची शेवटची बैठक घेऊन विकासकामांचा आढावा घेतला. कामे लवकर पूर्ण करा, निधी उपलब्ध करून द्या, असेही सांगितले. (प्रतिनिधी)
महालक्ष्मी मंदिराची कामे लवकरच
महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी मंजूर असलेल्या दहा कोटींतून दोन टप्प्यांत कामे होणार आहेत. ही कामे लवकरच सुरू होतील. निधी मिळण्यात काही तांत्रिक अडचणी होत्या, त्या आता दूर झाल्या आहेत. एकाच वेळी सर्व निधी लागणार नसल्याने प्राधान्यक्रमाने कामे आता सुरू करण्याच्या सूचना मनपा आयुक्त यांना दिल्या आहेत, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: 1,159 crore expenditure on development works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.