परिवहन दहा स्कूल बसेस सुरू करणार
By Admin | Updated: March 8, 2015 00:26 IST2015-03-08T00:22:27+5:302015-03-08T00:26:54+5:30
अंदाजपत्रक सादर : ७९ कोटी ७८ लाखांची तरतूद; महिला व पर्यटकांसाठी खास बस

परिवहन दहा स्कूल बसेस सुरू करणार
कोल्हापूर : महानगरपालिका केएमटी उपक्रमाच्या सन २०१५ -१६ च्या रुपये ७९ कोटी ७८ लाखांच्या अंदाजपत्रकास शनिवारी परिवहन समिती सभेत मंजुरी देण्यात आली. नवीन वर्षात शहरात १० स्कूल बसेस, गर्दीच्या वेळी महिलांसाठी विशेष बसेस उपलब्ध करून देण्याचा संकल्प केएमटी प्रशासनाने केला आहे. त्याचबरोबर ‘कोल्हापूर दर्शन’ बस सुरू करण्याचाही नव्याने संकल्प करण्यात आला आहे. विशेष म्हणजे केएमटी तोट्यात असतानाही भाडेवाढ करण्यात आलेली नाही.
महानगरपालिका परिवहन समितीची विशेष सभा शनिवारी सायंकाळी सभापती अजित पोवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत आयुक्त पी. शिवशंकर यांनी ‘केएमटी’चे नवीन वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले. ७९ कोटी ७८ लाख जमा आणि तेवढ्याच खर्चाचा तसेच भांडवली ३२ कोटी १ लाख ५० हजार जमेचा आणि तेवढ्याच खर्चाचा आराखडा आयुक्तांनी परिवहन समितीच्या मान्यतेसाठी सादर केला. त्याला सभेत मंजुरी देण्यात आली.
नवीन आर्थिक वर्षात १०४ नवीन बसेस ताफ्यात दाखल करून घेऊन त्या मार्गस्थ करणे, त्यांपैकी १० बसेस विद्यार्थी वाहतुकीसाठी उपलब्ध करून देणे, महिलांच्या सुरक्षिततेसाठी गर्दीच्या वेळी महिलांसाठी विशेष बससेवा उपलब्ध करून देणे, युटिलिटी व्हेईकल खरेदी करणे, शाळा-महाविद्यालयांत जाऊन पास वितरण व्यवस्था राबविणे असे संकल्प करण्यात आले आहेत.
नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीतून मुख्य यंत्रशाळा परिसर विकसित करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. शासनाच्या विशेष अनुदानातून नवीन बसेसवर व यंत्रशाळा परिसरात सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मिती व वापराचे नियोजन करण्यात आले आहे. यंत्रशाळेच्या आवारात रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रक ल्प राबविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)