कल्याण : ट्रक आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना कल्याण-पडघा रोडवरील गांधारी पुलावर मंगळवारी सकाळी घडली. अपघातात ट्रक पुलाचे कठडे तोडून थेट पाण्यात बुडाला. पोलिस आणि अग्निशमन दलाकडून ट्रक आणि चालकाची शोध मोहीम सुरू होती. मात्र, अपघातापूर्वीच चालत्या ट्रकमधून चालकाने उडी मारून त्याचा जीव वाचवल्याची माहिती पोलिसांना दिली.
सातच्या दरम्यान पनवेलहून निघालेला ट्रक गांधारी पुलावरून पडघ्याच्या दिशेने चालला होता. यावेळी पुलावर ट्रक आणि रिक्षाची धडक झाली. अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला, तर ट्रक थेट पुलावरील संरक्षक कठडा तोडून पाण्यात पडला. रिक्षातून प्रवास करणारी महिला मंगल वानखेडे हिचा जागीच मृत्यू झाला. दुसरी महिला, रिक्षाचालक नीलेश वानखेडे हा जखमी झाला आहे.
ट्रकचालक म्हणाला, मी सुखरूप... घटना घडताच कल्याण अग्निशमन दल, खडकपाडा पोलिस आणि वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जागरूक नागरिक संजय जाधव यांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान ट्रक चालकाला शोध घेत हाेते. ट्रकचालक ट्रकसोबत पाण्यात बुडाल्याची भीती व्यक्त होत होती. मात्र दोन तासांनंतर ट्रकचालक आजम अली हा या अपघातातून बचावल्याचे उघड झाले. अपघात घडण्यापूर्वी त्याने उडी मारून आपला जीव वाचवला होता. तो सुखरूप असल्याची माहिती त्याने पोलिसांना कळवली. या प्रकरणाचा तपास पोलिस करीत आहेत.