कल्याण : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणारा आरोपी विशाल गवळी हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी शनिवारी केला तर गवळी हा महेश यांचाच कार्यकर्ता असल्याचा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी केला.
गायकवाड यांनी सांगितले की, भाजपमध्ये त्याचे कुटुंबीय सक्रिय आहे. विशाल हा भाजपचे काम करीत होता. त्यामुळे इतक्या गंभीर स्वरूपाचा गुन्हा करून देखील त्याला फाशीची शिक्षा होणार की नाही, याची शाश्वती देता येत नाही. त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांवर राजकीय दबाव आहे. माझ्यावर हिललाईन पोलिस ठाण्यात गोळीबार झाला. या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट आहेत.
कल्याण पश्चिमेला महात्मा फुले, बाजारपेठ आणि खडकपाडा असे तीन पोलिस स्टेशन आहेत. कल्याण पश्चिमेइतकीच कल्याण पूर्वेची लोकसंख्या आहे. या ठिकाणी कोळसेवाडी हे केवळ एकच पोलिस स्टेशन आहे. या ठिकाणी पाेलिसांचे मनुष्यबळ कमी आहे. कल्याण पूर्वेत आणखी एक पोलिस स्टेशन स्थापन करावे. जेणेकरून मनुष्यबळ वाढल्यास गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल, याकडे गायकवाड यांनी लक्ष वेधले.
गवळी हा महेश गायकवाड यांचाच समर्थकगायकवाड यांच्या गंभीर आराेपाला भाजपचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी उत्तर दिले ते म्हणाले की, विशाल गवळी याचा भाजपशी काडीचा संबंध नाही. अशा प्रकारच्या संवेदनशील घटनेचे कोणीही राजकारण करू नये.
गवळी हा महेश गायकवाड यांचाच समर्थक आहे. त्याच्या फेसबुकवर जाऊन पहा. त्याचा पुरावा सूर्यवंशी यांनी सादर केला. घटनेच्या पहिल्या दिवसापासून भाजपने गवळीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा केला आहे, असे सूर्यवंशी म्हणाले.