मुरलीधर भवार -
कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरात रिक्षा चोरीला जात होत्या. त्यामुळे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या रिक्षाचोरीचा तपास करण्यासाठी पोलिस सक्रिय झाले होते. कोळशेवाडी पोलिसांची रात्रीची गस्त सुरू असताना कल्याण पूर्वेतील शंभरफुटी राेडवर रिक्षाचोरी करणारा सराईत चोरटा पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याच्याकडून पोलिसांनी चार रिक्षा जप्त केल्या आहेत. पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्यायदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पाेलिस निरीक्षक संदीप भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. विशाल वाघ यांनी या तपास कामात महत्त्वाची भूमिका बजावली. कल्याण पूर्वेतील शंभर फुटी रस्त्यावर पोलिसांची रात्रीच्या वेळी गस्त सुरू होती. त्यांनी एका रिक्षाचालकाला हटकले. त्याच्याकडे कागदपत्रे मागितली असता ती कागदपत्रे नव्हती, तसेच रिक्षा चालविण्याचा परवानादेखील नव्हता. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडे असलेली रिक्षा ही चोरीची होती. पोलिसांनी लगेचच त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याची चौकशी सुरू केली. त्याला अटक करून अधिक तपास केला असता त्याचे नाव राजेंद्र जाधव असल्याचे त्याने सांगितले.
प्रसंगी वायर जोडून रिक्षा चोरायचा राजेंद्र जाधव हा पार्क करून ठेवलेल्या अथवा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षा मास्टर कीचा वापर करून चोरी करायचा. ज्या ठिकाणी मास्टर की काम करत नसेल त्या ठिकाणी तो रिक्षातील वायरी जोडून रिक्षा सुरू करायचा आणि ती चोरून न्यायचा.
या हद्दीतून रिक्षा चोरीसडोंबिवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहा रिक्षांची चोरी केली. कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तीन रिक्षा चोरीला गेल्या होत्या. बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक रिक्षा चोरीस गेली होती. पोलिसांनी आतापर्यंत चोरीस गेलेल्या चार रिक्षा हस्तगत केल्या आहेत. या रिक्षा चोराच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यांत सहा गुन्हे दाखल आहेत. त्या गुन्ह्यांची उकल पोलिसांकडून करण्यात येत आहे.
...अन् भंगारात विक्रीराजेंद्र जाधव सराईत चोरटा असल्याचे उघड झाले. त्याने यापूर्वी कल्याण-डोंबिवली हद्दीत दुचाकी आणि रिक्षाचोरी केल्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. राजेंद्र हा बनावट चावीच्या आधारे पार्क करून ठेवलेल्या रिक्षा चोरी करून पसार व्हायचा. तो डोंबिवली पाइपलाइन परिसरात राहत होता. त्याचे आई-वडील नगरला राहतात. तो काही कामधंदा करीत नसल्याने रिक्षाचाेरीचा व्यवसाय सुरू केला होता. चोरी केलेल्या रिक्षा तो कर्जत येथील अहिल्यानगरात जाऊन १५ ते २० हजार रुपयांना भंगारात विकायचा.