उल्हासनगरात कचऱ्याचे विलगीकरण कचरावेचक महिलांच्या जिवावर
By सदानंद नाईक | Updated: April 26, 2025 18:16 IST2025-04-26T18:15:54+5:302025-04-26T18:16:34+5:30
आरोग्य सुरक्षा साहित्याशिवाय काम

उल्हासनगरात कचऱ्याचे विलगीकरण कचरावेचक महिलांच्या जिवावर
उल्हासनगर : सुका व ओला कचऱ्याचे विलगीकरणाचे काम हिराघाट बोट क्लब येथील आरआरआर केंद्रात चालते. कचरा वेगळा करणाऱ्या कचरावेचक महिलांना मास्क, हॅन्डग्लोज, गमबूट आदी सुरक्षेचे साहित्य दिले जात नसल्याने, महिलेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
उल्हासनगर महापालिका आयुक्त पदी मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती झाल्यावर, शहराचे रुपडे बदलत आहे. त्यांनी राबविलेल्या डीप स्वच्छता मोहीमेमुळे शहर स्वच्छ व सुंदरतेकडे वाटचाल करीत आहे. मात्र दुसरीकडे विकासाच्या नावाखाली नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. डम्पिंगवर जाणाऱ्या कचऱ्यात घट होण्यासाठी ओला व सुका कचऱ्याचे विलगीकरण करण्याचे केंद्र हिराघाट बोट क्लब येथे चालते. येथे येणाऱ्या कचऱ्याचे विलगीकरण करून, ओला कचरा जसे भाजीपाला, फुल, झाडाचे पत्ते आदी सिमेंट कुंड्यात टाकून त्याचे ग्रीन खत बनविले जाते. तर सुका कचऱ्यातून प्लास्टिक पिशव्या, कागद, कापड्याच्या चिंद्या, पुष्टे, काच व दगड-माती वेगळी केली जाते. यापैकी काही वस्तूचा पुन्हा वापर केला जातो.
हिराघाट येथील आरआरआर केंद्रात कचरा विलगीकरण करणाऱ्या बहुतांश महिला कचरावेचक असून त्यांना ठेकेदारा मार्फत दरदिवशीं ४०० रुपये मजुरी दिली जाते. असे त्यांचे म्हणणे आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजे पर्यंत त्यांच्याकडून काम करून घेतले जाते. दुघंधीयुक्त कचाऱ्यांचे काम करणाऱ्या या कचरावेचक महिलांना सुरक्षेतेचे कोणतेही साहित्य दिले जात नाही. मास्क, हॅन्डग्लोज, गमबूट, स्वच्छ पाणी, फॅन, सावली शिवाय उन्हात काम करतात. याबाबतची कल्पना महापालिका स्वच्छता निरीक्षक, अधिकारी, आयुक्त यांना नसावी, असे दिसते. शहर स्वच्छतेसाठी स्वतःचा जीव अवघ्या ४०० रुपयासाठी धोक्यात घालत आहेत. महापालिका आयुक्तानी याबाबत चौकशी करून, सबंधित अधिकारी व ठेकेदार यावर कारवाईची मागणी होत आहे.
हिराघाट बिट क्लब येथे कचऱ्याचे विलगीकरण करण्याचे काम एका खाजगी ठेकेदाराला दिले आहे. ठेकेदार कचरावेचक महिलाकडून कचरा विलगीकरणाचे काम करून घेतो. मास्क, हॅन्डगोल्स आदी सुरक्षेचे साहित्य पुरविले जात असून महिला त्याचा वापर करतात का नाही. याबाबत माहिती घेतो - मनिष हिवरे (सार्वजनिक आरोग्य अधिकारी उल्हासनगर महापालिका )