पदपथावरुन चालताय पण सावधान! तुटलेल्या झाकणामुळे नागरीक जखमी
By प्रशांत माने | Updated: April 21, 2023 17:26 IST2023-04-21T17:25:09+5:302023-04-21T17:26:41+5:30
सुंदरम अय्यर असे जखमी व्यक्तीचे नाव असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पदपथावरुन चालताय पण सावधान! तुटलेल्या झाकणामुळे नागरीक जखमी
डोंबिवली येथील ठाकुर्ली पूर्वेकडील ९० फीट रोडवरील एका शाळेसमोरील पदपथावरील तुटलेल्या झाकणामुळे एक ५३ वर्षीय व्यक्ती गटारात पडून गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. सुंदरम अय्यर असे जखमी व्यक्तीचे नाव असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अय्यर हे ९० फीट रोड परिसरातच राहतात. ते पत्नीसह पदपथावरुन वॉक करीत होते. त्यावेळी सुंदरम यांचा पाय तुटलेल्या झाकणावर पडला आणि ते गटारात कोसळले. यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. पायातून मोठया प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्यांना नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले गेले आहे.
परिसरात एक शाळा असल्याने इथली तुटलेली झाकणे तातडीने बदलावी अशी मागणी अय्यर यांनी केली आहे. दरम्यान ९० फीट प्रमाणे समांतर रस्त्यावरील पदपथावरील झाकणं ही काही ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत आहेत. तातडीने ती बदलण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. माजी नगरसेवक साई शेलार आणि भाजप पदाधिकारी राजू शेख यांनी ही महापालिका प्रशासनाला याबाबत निवेदन दिले आहे.