सोनसाखळी चोरणारे दोघे गजाआड; रामनगर पोलिसांची कामगिरी 

By सचिन सागरे | Updated: July 16, 2023 18:36 IST2023-07-16T18:36:30+5:302023-07-16T18:36:40+5:30

पोलीस पथकाने शिताफीने लक्की व सत्येंद्र या दोघांना पकडले.

two who stole the gold chain are behind bars Performance of Ramnagar Police | सोनसाखळी चोरणारे दोघे गजाआड; रामनगर पोलिसांची कामगिरी 

सोनसाखळी चोरणारे दोघे गजाआड; रामनगर पोलिसांची कामगिरी 

डोंबिवली : एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळून जाणाऱ्या लक्की श्याम चारी (२६, रा. आनंदनगर, मध्यप्रदेश) व सत्येंद्र गौरीशंकर जयस्वाल (३४, रा. दावडी, डोंबिवली) या दोघा चोरट्यांना गस्तीवर असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पाठलाग करून जेरबंद केले. 

शनिवारी रात्री ११ च्या सुमारास आयरे रोड परिसरात चित्रा नाडर (४८) उभ्या होत्या. यावेळी, एका रिक्षातून आलेल्या लक्की व सत्येंद्र यांनी चित्रा यांच्या गळ्यातील एक लाख १० हजार रुपये किमतीची सोनसाखळी खेचून पोबारा केला. यावेळी, चित्रा यांचे पती व मुलाने चोर चोर ओरडत त्या दोघांचा पाठलाग करायला सुरुवात केली. यावेळी, गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी रिक्षाचा पाठलाग केला. दोघे चोरटे डोंबिवली रेल्वे स्थानक येथे रिक्षा सोडून पळून जात होते. त्यावेळी, पोलीस पथकाने शिताफीने लक्की व सत्येंद्र या दोघांना पकडले. या दोघांकडील सोनसाखळी तसेच, गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व मोबाईल असा २ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करीत दोघांना अटक केली. सदरची कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक बळवंत भराडे, पोलीस उपनिरीक्षक सचिन देसाई, पोलीस हवालदार विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, शेखर कोळी, पोलीस नाईक दिलीप कोती व पोलीस अंमलदार नितीन सांगळे यांनी केली. 
 

Web Title: two who stole the gold chain are behind bars Performance of Ramnagar Police