आंतरराष्ट्रीय स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांना साहसी मानवंदना
By सचिन सागरे | Updated: February 18, 2025 21:09 IST2025-02-18T21:08:54+5:302025-02-18T21:09:23+5:30
महाराजांना अशाप्रकारची मानवंदना देणारे अजित प्रथम भारतीय नागरिक ठरले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांना साहसी मानवंदना
कल्याण : रशियामधील एरोग्लॅड कोलम्ना येथे उणे ३६ अंश सेल्सिअस तापमानामध्ये स्कायड्रायविंग करत छत्रपती शिवाजी महाराज यांना अजित कारभारी यांनी साहसी मानवंदना दिली. महाराजांना अशाप्रकारची मानवंदना देणारे अजित प्रथम भारतीय नागरिक ठरले.
पश्चिमेकडील कोळीवली गावातील कुस्तीपटु बळीराम कारभारी यांचे अजित हे पुत्र आहेत. विभागीय क्षेत्ररक्षक नागरी संरक्षण, नवी मुंबई ठाणे येथे अजित सुमारे २० वर्षांपासून स्वयंसेवक म्हणून काम करतात. अजित हे ठाणे जिल्हा कयाकिंग व कनोइंग असोसिएशनचे सचिव तसेच ठाणे जिल्हा साहसी खेळ संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी ब्रिगेडियर सौरभ सिंह शेखावत यांच्या प्रोत्साहनाने रशियामधील एरोग्लॅड कोलम्ना येथे उणे ३६ अंश सेल्सिअस तापमानामध्ये एल४१० या हवाई जहाजातून ५१०० मीटर (१६,७३२ फुट) आकाशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा ध्वज फडकवत महाराजांना साहसी मानवंदना दिली.
कर्नल कोस्त्या क्रिवोशिव (रशियन आर्मी स्कायडाइव मुख्य प्रशिक्षक) व युनायटेड स्टेट पॅराशूट असोसिएशन, अमेरिकाचे स्काय ड्रायविंग प्रशिक्षक राहुल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अजित यांनी साहसी कामगिरी यशस्वीरीत्या पूर्ण केली.