कंपन्यांसह वस्तीत आग पसरण्याची होती भीती; सिव्हिल डिफेन्सने घेतली विशेष काळजी
By सचिन सागरे | Updated: May 27, 2024 11:54 IST2024-05-27T11:54:08+5:302024-05-27T11:54:33+5:30
अमूदान कंपनी परिसरात अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधकार्य केले

कंपन्यांसह वस्तीत आग पसरण्याची होती भीती; सिव्हिल डिफेन्सने घेतली विशेष काळजी
सचिन सागरे, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: कंपनीला लागलेली आग, त्याचबरोबर बाजूच्या कंपन्यांमध्ये असलेली विविध रसायने, मधेच होणारे स्फोट, रसायन असलेले दोन टँकर, रस्त्यावर सांडलेले रसायन, अडकलेल्या कामगारांचे आक्रोश यावर लक्ष ठेवत अमूदानमधील आग विझवताना आजूबाजूच्या कंपन्यांसह नागरी वस्तीला नुकसान होणार नाही याची काळजी घेत सिव्हिल डिफेन्समधील टीमसह इतर आपत्कालीन सर्व्हिसने शोधमोहीम राबविली. मोहिमेदरम्यान ड्रोनचाही वापर करण्यात आला.
अमूदानला गुरुवारी दुपारी आग लागल्याची माहिती मिळताच सिव्हिल डिफेन्सचे पथक घटनास्थळी दाखल झाले. कंपनीत नेमके कोणते रसायन आहे तसेच अन्य माहिती घेतली, असे सिव्हिल डिफेन्समधील डॉ. राहुल घाटवळ यांनी सांगितले. अमूदानमध्ये हायड्रोजन पॅरॉक्साइड होते. त्यामुळे आग विझवताना योग्य काळजी घेतील. या कंपनीच्या पाठीमागे असलेल्या कलर कंपनीचे सल्फर ॲसिडचे दोन टँकर तिथेच उभे होते. बाजूलाच मॉडर्न गॅसचा प्लांट आहे. त्यामुळेही दक्षता घेतली, असे डॉ. घाटवळ यांनी सांगितले.
- मानवी अवयव शोधण्याचे काम प्रगतिपथावर- अमूदान कंपनीत झालेल्या स्फोटानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. या स्फोटामध्ये इतरत्र उडालेले मानवी अवयव शोधण्याचे काम प्रगतिपथावर सुरू असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली.
- रुग्णांवर उपचार सुरू- डोंबिवली एमआयडीसी परिसरात झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या १८ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यापैकी सहा रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत, अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी दिली.
- चौकशी सुरूच- शास्त्रीनगर रुग्णालयात उभारलेल्या चौकशी केंद्राला अनेकजण अजूनही भेटी देत आहेत. आपल्या परिचितांचा काही ठावठिकाणा लागतोय का हे पाहण्यासाठी नातेवाइकांची गर्दी होत आहे.