गावचा गोंधळ दिल्लीपर्यंत गेला, युतीचा सर्वाधिक लाभ नेमक्या कोणत्या पक्षाच्या पारड्यात पडणार?
By मुरलीधर भवार | Updated: December 19, 2025 12:03 IST2025-12-19T12:02:30+5:302025-12-19T12:03:18+5:30
शिवसेना-भाजपचे वर्चस्व असलेल्या कल्याण-डोंबिवलीत उद्धवसेना-मनसे एकत्र येत कडवी झुंज देण्याच्या तयारीत; भाजप-शिंदेसेनेने मातब्बर माजी नगरसेवक गळाला लावल्याने संघर्ष वाढला; शरद पवार गट, काँग्रेस अजूनही शांतच

गावचा गोंधळ दिल्लीपर्यंत गेला, युतीचा सर्वाधिक लाभ नेमक्या कोणत्या पक्षाच्या पारड्यात पडणार?
मुरलीधर भवार
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत १९९५ पासून २०२०पर्यंत शिवसेना भाजपची सत्ता आहे. यापूर्वी -दोनवेळा युती करून, तर दोनवेळा स्वतंत्रपणे शिवसेना - भाजपने निवडणुका लढवल्या. यावेळी महायुती करून निवडणूक लढवण्याचे संकेत दोन्ही पक्षांनी दिल्याने या निवडणुकीत युतीत सर्वाधिक लाभ शिवसेनेला होणार की, भाजपला, याकडे लक्ष लागले आहे.
निवडणुकीच्या तोंडावर शिंदेसेना आणि भाजपने एकमेकांच्या पक्षातील माजी नगरसेवक गळाला लावले. त्यातून त्यांनी त्यांच्या पक्षातील पॅनल सुरक्षित केली. यानंतर दिल्लीतून युतीचा आदेश आला. त्यामुळे ही युती कुणाला फलदायी ठरते, ते निकालानंतर समजेल.
एकूण प्रभाग किती आहेत? - ३१
एकूण सदस्य संख्या किती? - १२२
प्रशासकीय राज संपणार
महापालिकेची यापूर्वीची निवडणूक २०१५ मध्ये झाली. तिचा कालावधी २०२० मध्ये संपुष्टात आला. पण कोरोनामुळे महापालिकेची निवडणूक पार पडली नाही. २०२०पासून महापालिकेत प्रशासकीय राजवट होती. निवडणुकीमुळे प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार आहे.
कोणते मुद्दे ठरतील निर्णायक ?
प्रगतीपथावरील काही प्रकल्प मार्गी लागत नाहीत तोपर्यंत वाहतूक कोंडीतून सुटका नाही. प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे.
महापालिकेची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहे. २७गावात अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. स्वतंत्र धरणाची गरज आहे.
घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न आहे. तीन प्रभाग वगळता अन्य ठिकाणी त्याचे खासगीकरण केले आहे.
आता काय आहेत राजकीय समीकरणे?
शिंदेसेना, भाजप एकत्रित लढणार असले तरी महायुतीमधील अजित पवार गट यामध्ये नसेल. मनसे, उद्धव सेनेच्या युतीची शक्यता आहे. शरद पवार गट, काँग्रेसकडून निवडणुकीबाबत फारशा हालचाली नाहीत.
कुणाची होती सत्ता?
शिवसेना - ५३
भाजप - ४३
काँग्रेस - ४
राष्ट्रवादी - २
मनसे - ९
बसपा - १
एमआयएम - १
अपक्ष - ९
मागील निवडणुकीत एकूण मतदार किती?
एकूण मतदार - १२,५०,६४६
पुरुष - ५,८१,९१६
महिला - ६,६८,७३०
आता एकूण किती मतदार?
एकूण मतदार - १४,२४,७४८
पुरुष - ७,४५,४७०
महिला - ६,७८,७२६
इतर - ५५२