रिक्षाचालकाने घडविले प्रामाणिकपणाचे दर्शन; विसरलेला लॅपटॉप प्रवाशाला केला परत
By प्रशांत माने | Updated: August 16, 2023 17:50 IST2023-08-16T17:48:07+5:302023-08-16T17:50:18+5:30
प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : एकीकडे प्रवासी भाडे नाकारणाऱ्या मुजोर रिक्षाचालकांच्या नावाने प्रवासी खडे फोडत असताना दुसरीकडे एका ...

रिक्षाचालकाने घडविले प्रामाणिकपणाचे दर्शन; विसरलेला लॅपटॉप प्रवाशाला केला परत
प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: एकीकडे प्रवासी भाडे नाकारणाऱ्या मुजोर रिक्षाचालकांच्या नावाने प्रवासी खडे फोडत असताना दुसरीकडे एका रिक्षाचालकाने प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले. प्रवासादरम्यान रिक्षामध्ये विसरलेला लॅपटॉप संबंधित प्रवाशाला परत केला. सुभाष राठोड असे प्रामाणिकपणाचे दर्शन घडविणाऱ्या रिक्षाचालकाचे नाव आहे.
मंगळवारी सूचक नाका येथे राहणारे मदनलाल कुमावत यांनी कल्याण रेल्वेस्थानकात उतरून रिक्षातून सूचक नाका गाठले. पण, रिक्षातून उतरताना ते त्यांच्याजवळील लॅपटॉप गडबडीत रिक्षातच विसरले. रिक्षाचालक राठोड यांच्या ही बाब लक्षात आली असता त्यांनी रिक्षाचालक मालक असोसिएशन या संघटनेचे उपाध्यक्ष जितेंद्र पवार यांच्याशी संपर्क साधला. लॅपटॉप स्वर्गीय प्रकाश पेणकर (नाना) यांचे जनसंपर्क कार्यालयात जमा केला. पदाधिकाऱ्यांनी याबाबतचा संदेश सोशल मीडियावर टाकला. तो व्हायरल होत त्याची माहिती प्रवासी कुमावत यांना मिळाली. त्यांनी जनसंपर्क कार्यालयात धाव घेतली असता रिक्षाचालक राठोड यांच्यासमक्ष संघटनेचे उपाध्यक्ष पवार यांनी लॅपटॉप त्यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी प्रतीक पेणकर, सतीश मलबारी, अनंता नेमाडे, हेमंत सांगळे, रवेश सिमले, विजय गायकवाड आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्याध्यक्ष संतोष नवले यांनीही राठोड यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक करून शाबासकी दिली. दरम्यान, राठोड यांचा मुलगा आजारी आहे. उपचारासाठी पैशांची चणचण भासत असतानाही त्यांनी रिक्षात विसरलेला लॅपटॉप प्रामाणिकपणे परत दिला. प्रवासी कुमावत यांनी रिक्षा - टॅक्सीचालक - मालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांना प्रत्यक्ष भेटून संघटनेचे आभार मानले.