आधारवाडी कारागृह जेल अधिक्षक म्हणतात, 'हे' तर खोडसाळपणाचे कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2021 04:54 PM2021-08-10T16:54:36+5:302021-08-10T16:55:46+5:30

- मयुरी चव्हाण कल्याण - कल्याण येथील आधारवाडी कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आहे. कारण या कारागृहाच्यास्वच्छतागृहात मोबाईल फोन, विद्युत ...

The superintendent of Aadharwadi Jail says, This is an act of indecency. | आधारवाडी कारागृह जेल अधिक्षक म्हणतात, 'हे' तर खोडसाळपणाचे कृत्य

आधारवाडी कारागृह जेल अधिक्षक म्हणतात, 'हे' तर खोडसाळपणाचे कृत्य

googlenewsNext

- मयुरी चव्हाण

कल्याण- कल्याण येथील आधारवाडी कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आहे. कारण या कारागृहाच्यास्वच्छतागृहात मोबाईल फोन, विद्युत वायर, स्टील पिन आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. याप्रकरणी सोमवारी  खडकपाडा  पोलीस आणि  आधारवाडीच्या जेल अधिक्षकांशी संपर्क साधला असता त्यांनी मौन बाळगले होते. मात्र मंगळवारी जेल अधीक्षकांनी "लोकमत"शी बोलताना यावर भाष्य केले आहे. हा प्रकार कोणीतरी मुद्दाम केला आहे. आम्हाला बदनाम करण्यासाठी कोणीतरी हा खोडसाळपणा केला आहे. हे एक षडयंत्र आहे असा दावा जेल अधिक्षक   ए. एस. सदाफुलें यांनी केला आहे. 
      
शुक्रवारी आधारवाडी कारागृहात कर्मचा-यांनी अचानक पाहणी केली असता एका बॅरेकमधील शौचालयात दोन पाण्याच्या ड्रममध्ये लोणच्याचे भांडं  नजरेस पडले.  जार उघडल्यावर त्यांना त्यात एक मोबाईल फोन, एक इलेक्ट्रिक वायर, 25 ते 30 स्टील पिन, इलेक्ट्रिक सर्किट बोर्ड आणि सीलंटची दोन पाकिटे सापडल्याचे उघड झाले..याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे.  मात्र खडकपाडा पोलिसांसह, वरिष्ठ अधिकारी तसेच जेल अधिक्षक ए. एस. सदाफुले  यांनी सोमवारी यावर अधिक भाष्य करणे टाळले होते. मात्र मंगळवारी जेल अधिक्षक  सदाफुलें यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

जेल प्रशासनाचा  कारभार सुव्यस्थित सुरू असताना कोणीतरी  मुद्दाम प्रशासनाला बदनाम करण्यासाठी हा खोडसाळपणा केला  असल्याचे ते म्हणाले. तसेच जेल मध्ये असलेल्या गुन्हेगारांपैकी कोणी कोणाला फसवण्यासाठी  हा मार्ग निवडला असेल किंवा प्रशासनाला अडचणीत आणण्यासाठी हा प्रकार केला गेला असावा. मात्र प्रशासन सतर्क असल्यामुळेच  ही घटना उजेडात आली.  असा प्रकार पून्हा घडू नये म्हणून आणि याचा  सखोल तपास व्हावा म्हणूनच लागलीच खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही सदाफुले यांनी सांगितले. 

मोबाईल व इतर गोष्टी जेलमध्ये पोहचल्याच कशा यावर उत्तर देताना सदाफुलें यांनी सांगितले की  संरक्षक भिंतीवरून कारागृहाच्या आत वस्तू फेकण्याचे अनेक प्रकार यापूर्वीदेखील झाले आहेत. मी आल्यानंतर अधिक कडक लक्ष ठेवून यावर नियंत्रण आणले. त्यामुळे प्रशासनाला अडचणीत आणण्यासाठी हा प्रकार केला गेला आहे . तसेच  याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असल्याचे ते म्हणाले. 

कारागृहातुन जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये मोबाईल देखील आहे. मात्र या मोबाईल मध्ये कोणतेही सीमकार्ड आढळून आले नाही. मात्र अन्य पर्याय निवडून या मोबाईल द्वारे पोलिसांचा तपास सुरू असून अद्याप यामागे कोण आहे ही बाब निष्पन्न झाले नसल्याची माहिती खडकपाडा पोलिसांच्या सूत्रांनी  दिली.
 

Web Title: The superintendent of Aadharwadi Jail says, This is an act of indecency.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.