डोंबिवली एमआयडीसीत रासायनिक सांडपाण्याची गळती
By अनिकेत घमंडी | Updated: April 12, 2023 17:36 IST2023-04-12T17:33:49+5:302023-04-12T17:36:13+5:30
रासायनिक सांडपाणी आणि घरगुती सांडपाणी हे दोन्हीही जवळचा नाल्यात मिसळले जात असल्याने त्याचा प्रदूषणाचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे.

डोंबिवली एमआयडीसीत रासायनिक सांडपाण्याची गळती
डोंबिवली: येथील एमआयडीसी फेज दोन मधील रासायनिक प्रक्रिया केलेले सांडपाणी हे भूमिगत पाइपलाइनद्वारे निवासी भागातील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी रोडवरून ते फेज एक कडे जाते. एमआयडीसी निवासी मधील चार बिल्डिंग भागातील गौरीनंदन सोसायटी समोर त्या पाइपलाइनला एक व्हॉल्व असून मंगळवारी रात्रीपासून त्यातून हे रासायनिक सांडपाणी गळती होऊन ते जवळच्या मोठ्या नाल्यात जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन रासायनिक दुर्गंधी येत आहे. यामुळेच तेथे राहणाऱ्या रहिवाशांना आणि रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना त्याचा भयंकर त्रास होत आहे.
रहिवाशांनी याबद्दल तक्रारी एमआयडीसी/केडीएमसीकडे केल्या असून अद्याप यावर कार्यवाही झाली नसल्याची माहिती दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी दिली. सद्या तेथेच रस्त्याचे काँक्रीटीकरण काम चालू असताना नवीन घरगुती सांडपाणी चेंबर्स बनविण्याचे काम संथ गतीने चालू आहे. त्यामुळे आता घरगुती सांडपाणी हे नाल्यात मिसळले जात असल्याने दुर्गंधी पसरली होती. रासायनिक सांडपाणी आणि घरगुती सांडपाणी हे दोन्हीही जवळचा नाल्यात मिसळले जात असल्याने त्याचा प्रदूषणाचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. त्यामुळे येथील नागरिक वैतागले असून जर वेळीच यावर योग्य ती कार्यवाही केली नाही तर एमआयडीसी/एमपीसीबी कार्यालयावर नागरिक धडक मारणार असल्याचे ते म्हणाले.