या भटक्या कुत्र्यांना कोणी तरी आवरा हो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2024 09:53 IST2024-12-16T09:53:15+5:302024-12-16T09:53:59+5:30

माणसाळलेल्या, प्रशिक्षित आणि  पाळलेल्या कुत्र्यांच्या इथे प्रश्न नाही.

someone please stop these stray dogs | या भटक्या कुत्र्यांना कोणी तरी आवरा हो!

या भटक्या कुत्र्यांना कोणी तरी आवरा हो!

राजेश पिल्लेवार, वृत्त संपादक

टिटवाळ्याच्या रिजन्सी सर्वम सोसायटीचा तो भयानक व्हिडीओ तुम्ही बघितलाय का? चार भटक्या कुत्र्यांची टोळी एका वृध्द असहाय महिलेवर हल्ला चढवते. तिच्या अंगावरील कपडे ओरबाडून टाकतात. तिच्या शरीराचे लचके तोडतात. तिला ५० मीटरपर्यंत फरफटत नेतात. सुदैवानं काही लोकांचं लक्ष जातं आणि ते धावतात. पण तोपर्यंत तिच्या अंगावर गंभीर जखमा झालेल्या असतात. तिला लगेच इस्पितळात हलवण्यात येतं. आता तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. अतिशय चीड आणणारी ही घटना.

सोशल मीडियातून ती सर्वत्र पसरली. लोकांनी हळहळ व्यक्त केली. काहींनी रोष व्यक्त केला. कुणी सरकारवा बोल लावले तर कोणी प्राणिमित्रांच्या नावाने बोटे मोडली. बरं, भटक्या कुत्र्यांनी सामान्य लोकांवर हल्ला चढविण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे का? वाघबकरी या प्रसिद्ध चहाचे मालक पराग देसाई यांचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने लहान मुलांना घेरून त्यांचे लचके तोडल्याच्या अनेक घटना अधूनमधून कानावर पडतात. कुत्र्यांनी पाठलाग केल्याने अनेक दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघात घडले आहेत. अशा घटना वारंवार घडत आहेत. 

माणसाळलेल्या, प्रशिक्षित आणि  पाळलेल्या कुत्र्यांच्या इथे प्रश्न नाही. त्यांच्या बाबतीत जर काही घडले तर संबंधित मालक त्यासाठी जबाबदार असतात. प्रश्न आहे तो रस्त्यांवरील मोकाट कुत्र्यांचा. कोण आहे या अशा कुत्र्यांचा पोशिंदा? या कुत्र्यांच्या संख्यावाढीसाठी कोणाला जबाबदार धरायचे? लहान मुले, एकटी-दुकटी वृध्द मंडळी, रात्री जीव मुठीत घेऊन रस्त्यांवरून जाणारे दुचाकीस्वार यांच्या जीवावर उठलेल्या भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवायचे तरी कुणी? बरं, धडधाकट माणसालाही अशा कुत्र्यांची भीती असतेच. गल्लोगल्ली अशा भटक्या कुत्र्यांच्या मोठाल्या टोळ्या ठाण मांडून आहेत. त्यांना खाऊ पिऊ घालणारे कनवाळू आहेत. दिवसागणिक ही मोठी गंभीर समस्या होत चालली आहे, हे मान्य करून या समस्येकडे बघावे लागेल. मुळात ही समस्या आहे, हे आधी मान्य करावे लागेल. २०३० पर्यंत देश रेबिजमुक्त करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. प्राणीमित्र, स्वयंसेवी संस्था आणि सरकारी यंत्रणा अशा सगळ्यांना हातात हात घालून काम करावे लागेल. नसबंदीच्या खर्चावर उपाय बघावा लागेल. जगात नेदरलँड हा एकमेव भटक्या कुत्र्यांपासून मुक्त असा देश आहे. त्यांनी काय केले, त्याचा अभ्यास करावा लागेल. तरच या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मार्गी लागू शकेल.

कायदा काय सांगतो?

पहिला क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० साली झाला. २००२ मध्ये त्यातील दुरुस्तीनुसार भटकी कुत्री देशाचे मूळ रहिवासी आहेत. कलम ४२८ आणि ४२९ नुसार, भटक्या कुत्र्यावर अत्याचार केले, ठार मारले किंवा अपंग केले तर आरोप सिद्ध झाल्यास पाच वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो.

१.८४ कोटी भारतीयांना दरसाल कुत्री चावा घेतात. ३६ टक्के जगात रेबिजने मृत्यू होण्याच्या एकट्या भारतातील घटना. रेबिजमुळे सर्वाधिक मृत्यू १५ वर्षांखालील मुलांचे होतात.

 

Web Title: someone please stop these stray dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :dogकुत्रा