रामदास कदम यांच्या प्रतिमेस शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन; डोंबिवलीत शिवसेनेची निदर्शने
By अनिकेत घमंडी | Updated: September 21, 2022 14:10 IST2022-09-21T14:09:59+5:302022-09-21T14:10:25+5:30
पूर्वेकडील इंदिरा गांधी चौकानजीक मध्यवर्ती शिवसेना शाखेबाहेर आंदोलन करण्यात आले,

रामदास कदम यांच्या प्रतिमेस शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन; डोंबिवलीत शिवसेनेची निदर्शने
डोंबिवली :
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ डोंबिवलीत कल्याण जिल्हा शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांच्या प्रतिमेस बुधवारी जोडे मारण्याचे आंदोलन करण्या करून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. पूर्वेकडील इंदिरा गांधी चौकानजीक मध्यवर्ती शिवसेना शाखेबाहेर आंदोलन करण्यात आले, शिवसेनेच्या महिला संघटक कार्यकर्त्यांनी कदम यांच्या प्रतिमेस जोडे मारण्यात आले. त्यानंतर निषेधाच्या घोषणा शिवसैनिकांनी दिल्या.
शहरप्रमुख विवेक खामकर म्हणाले की, असंबध बोलायची सवय कदम यांना आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी कदम यांना आमदारकी, मंत्रीपदे दिली, त्याच कुटुंबाबद्दल ते इतक्या खालच्या पातळीवर टीका करतील, अशी अपेक्षा कोणी केली नव्हती. कदम यांनी त्यांचा खरा रंग दाखविला. शिवसेना विरोधात सुपारी घेऊन शिवसेनेवर आगपाखड करण्याचा उद्योग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदार नेत्यांनी चालवलेला आहे. विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी कदम यांची धावपळ सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे कुटुंबाची माफी त्यांनी मागावी असेही खामकर म्हणाले. त्यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, मंगला सुळे, वैशाली दरेकर, तात्या माने यांच्यासह शिवसेनेचे अन्य मान्यवर उपस्थित होते.