प्रशांत माने, कल्याणKalyan Video: वंश लांडगे हा सात वर्षीय मुलगा तिसऱ्या मजल्यावरील आपल्या घरात बाल्कनीतील ग्रीलमध्ये खेळत असताना ग्रील अचानक तुटली. ग्रील खाली कोसळण्याच्या स्थितीत असताना शेजाऱ्यांनी दाखविलेले प्रसंगावधान आणि अग्निशमन विभागाच्या जवानांनी दाखविलेली तत्परता, यामुळे सात वर्षाच्या वंश नवे आयुष्य मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ही थरारक घटना कल्याण पुर्वेकडील कोळसेवाडी, शनी मंदिर येथील चंद्रकिरण सोसायटीत घडली. वंशचे आईवडील घरी नव्हते. तो संध्याकाळी सहाच्या सुमारास घराच्या बाल्कनीतील ग्रीलमध्ये खेळत होता.
लटकलेल्या वंशला बघितले अन् शेजाऱ्यांनी...
यावेळी अचानक ग्रील तुटली आणि खालच्या सज्जावर कोसळण्याच्या स्थितीत लटकत राहिली. वंश देखील त्या लटकलेल्या ग्रीलला पकडून सज्जावर अडकला होता.
ग्रील तुटल्याचा प्रकार जेव्हा घडला, तेव्हा मोठा आवाज झाला. तुटलेली ग्रील आणि त्याला लोंबकळत असलेला वंश पाहताच तत्काळ ड प्रभागाच्या अग्निशमन विभागाला याची माहिती दिली गेली.
वंशला असं उतरवण्यात आले खाली
शेजाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत ग्रील पकडून ठेवली. अग्निशमन घटनास्थळी पोहोचताच तिसऱ्या मजल्यापर्यंत शिडी लावली. वंशला दोरीने बांधून खाली उतरविण्यात आले.
वंशला सुखरूप उतरविल्याचे पाहताच तेथील उपस्थित नागरिकांचा जीव भांड्यात पडला. सोसायटीतील रहिवाशी तसेच नागरिकांनी अग्निशमन दलाचे अधिकारी संजय म्हस्के आणि त्यांच्या टीमचे आभार मानले.