अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला सश्रम कारावास
By सचिन सागरे | Updated: November 1, 2023 15:41 IST2023-11-01T15:40:07+5:302023-11-01T15:41:03+5:30
टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची फेब्रुवारी २०१९ मध्ये मोहितसोबत ओळख झाली.

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला सश्रम कारावास
कल्याण : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या मोहित विष्णू भोईर (रा. कचोरे गाव, कल्याण) याला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एस. बी. कचरे यांनी दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची फेब्रुवारी २०१९ मध्ये मोहितसोबत ओळख झाली. ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाल्यानंतर दोघे एकमेकांना भेटत होते. ऑक्टोबर २०१९ मध्ये पीडितेला जबरदस्तीने मलंगड येथील एका लॉजवर आरोपी घेऊन गेला. त्याठिकाणी पीडितेला विवस्त्र करून तिचे नग्न अवस्थेत व्हिडिओ काढत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर ब्लॅकमेल करत पिडीतेवर आरोपीने वारंवार अत्याचार केला. बनावट खाते तयार करून पिडितेचे व्हिडिओ व्हायरल केले.
पीडितेच्या कुटुंबीयांना व्हिडिओबाबत माहिती होताच त्यांनी डिसेंबर २०१९ मध्ये टिळकनगर पोलीस ठाण्यात मोहितविरोधात गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक विनोद कडलग यांनी आरोपीला तत्काळ अटक केली. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय धुरी यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सरकारी वकील रचना भोईर यांनी कामकाज पाहिले.