हत्येचा प्रयत्न करणाऱ्याला सश्रम कारावास; कल्याण न्यायालयाचा निकाल
By सचिन सागरे | Updated: September 4, 2024 17:56 IST2024-09-04T17:56:05+5:302024-09-04T17:56:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : पोलिसांचा खबरी असल्याचा राग मनात धरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सद्दाम हुसेन अब्दुल ...

हत्येचा प्रयत्न करणाऱ्याला सश्रम कारावास; कल्याण न्यायालयाचा निकाल
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : पोलिसांचा खबरी असल्याचा राग मनात धरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सद्दाम हुसेन अब्दुल रज्जाक शेख (रा. उल्हासनगर) याला कल्याण जिल्हा व अति. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश प्रदीप अष्टूरकर यांनी दहा वर्षे सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
भाऊ पोलिसांचा खबरी असल्याचा राग मनात धरून आरोपी सद्दाम हुसेन याने फरहान खान (रा. उल्हासनगर) याला प्लास्टिकची खुर्ची फेकून मारली. त्यानंतर, फरहान तसेच अदिल शेख यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने सद्दाम हुसेन याने चाकू हल्ला करत दोघांना गंभीर जखमी केले. सदरची घटना मे २०२२ मध्ये शहाड फाटक परिसरात घडली. याप्रकरणी फरहानच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात सद्दाम हुसेनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाने व पोलीस निरीक्षक (गुन्हे) चंद्रहार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक चेतन बागुल यांनी न्यायालयात सद्दाम हुसेनविरोधात आरोपपत्र दाखल केले. त्यांना पोलीस नाईक पांढरे मदत केली. सरकारतर्फे सहायक सरकारी अभियोक्ता म्हणून सचिन कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले. त्यांना पैरवी अंमलदार के. के. शेख, मदतनीस पोलीस हवालदार कसीवले, पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गांगुर्डे, रवी कोर यांनी मदत केली.