उदरनिर्वाहासाठी पत्करला रिक्षा चोरीचा मार्ग! नंबर बदलला आणि चोरीचे पितळ पडले उघडं

By प्रशांत माने | Published: April 12, 2024 03:11 PM2024-04-12T15:11:18+5:302024-04-12T15:11:40+5:30

आरोपी अटक; गुन्हे अन्वेषणची कारवाई

Rickshaw theft for livelihood The number was changed and the stolen was exposed | उदरनिर्वाहासाठी पत्करला रिक्षा चोरीचा मार्ग! नंबर बदलला आणि चोरीचे पितळ पडले उघडं

उदरनिर्वाहासाठी पत्करला रिक्षा चोरीचा मार्ग! नंबर बदलला आणि चोरीचे पितळ पडले उघडं

डोंबिवली: दुसऱ्याची रिक्षा भाडयाने चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने एका रिक्षा चालकाने रिक्षा चोरीचा मार्ग पत्करला. चोरलेली रिक्षा खराब झाल्याने त्याने दुसरी रिक्षाही चोरली, पण रिक्षाचा नंबर बदलल्यामुळे चोरीचे पितळ उघड पडले आणि तो कल्याण गुन्हे अन्वेषण विभाग पोलिसांच्या जाळयात सापडला. बबलू पवार असे अटक आरोपीचे नाव असून तो अंबरनाथ तालुक्यातील भाल येथील राहणारा आहे. त्याच्याकडील चोरीच्या दोन्ही रिक्षा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

रिक्षाची चोरी करून त्याचा नंबर बदलून प्रवासी भाडे घेण्यासाठी कल्याण-शीळ मार्गावरील रूणवाल गार्डन गृहसंकुल याठिकाणी एकजण येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत कल्याण गुन्हे शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल गोरक्ष शेकडे यांना मिळाली. त्यांनी ही माहिती वरीष्ठ पोलिस निरिक्षक नरेश पवार यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडे यांच्यासह पोलिस कर्मचारी विजेंद्र नवसारे, दत्ताराम भोसले, मिथुन राठोड, गुरूनाथ जरग आदिंनी रूणवाल गार्डन परिसरात सापळा लावला.

बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार नंबर बदलून रिक्षा चालविणारा बबलू पवारला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने दोन रिक्षा चोरल्याची कबुली दिली. त्याने कळवा येथे आधी रिक्षा चोरली होती पण ती नादुरूस्त झाल्याने त्याने हिललाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुसरी रिक्षा चोरल्याची माहिती समोर आली. बबलू सुरूवातीच्या काळात दुसऱ्याची रिक्षा चालवित होता. पण संबंधित रिक्षामालकाला प्रवासी भाड्याचे पैसे देऊन त्याला उर्वरीत पैसे पुरत नव्हते. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा असा प्रश्न बबलूला पडला होता. त्यातून त्याने रिक्षा चोरीचा मार्ग पत्करल्याची माहिती वरीष्ठ पोलिस निरिक्षक नरेश पवार यांनी दिली.

Web Title: Rickshaw theft for livelihood The number was changed and the stolen was exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण