डोंबिवली - काश्मीरमधील पेहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात डोंबिवलीतील संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला. हे तिघेही मावस भाऊ आहेत. त्यांच्या मृत्यूचे वृत्त धडकताच डोंबिवली शहरावर शोककळा पसरली. दहशतवाद्यांची एक गोळी संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले याच्या हाताच्या बोटाला चाटून गेल्याने तो जखमी झाला आहे. त्यांचे अन्य कुटुंबीय मात्र सुखरूप आहेत.
संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी हे कुटुंबासह काश्मीरला गेले होते. तेथे फिरताना काढलेले फोटो, सेल्फी त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. काश्मीरमधील थंडगार वातावरण, निसर्गसौंदर्य यांची माहिती ते नातलगांना देत होते. मात्र, ही पर्यटनयात्रा त्यांच्यासाठी काळ ठरली. हे तिघेही डोंबिवली पश्चिमेला राहतात. ते शिंदेसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांचे नातेवाईक आहेत. तिघांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या माहितीला कदम यांनीच दुजोरा दिला. संजय लेले यांचे पुत्र हर्षल हे किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र उर्वरित कुटुंबीय सुखरूप असल्याचे कदम यांनी सांगितले. आपण बुधवारी पहाटे काश्मीरला जात असल्याचेही ते म्हणाले.
पनवेलच्या दिलीप देसले यांचा मृत्यूदहशतवादी हल्ल्यात पनवेल खांदा कॉलनीत राहणाऱ्या दिलीप देसले यांचा मृत्यू झाला; तर सुबोध पाटील आणि त्यांच्या पत्नी माणिक पाटील हे दोघे जखमी झाले आहेत. निसर्ग ट्रॅव्हल्स पनवेल येथून एकूण ३९ पर्यटक जम्मू-कश्मीर पर्यटनासाठी गेले होते. त्यांपैकी या तिघांचा समावेश आहे. श्रीनगर येथे हॉस्पिटलमध्ये एअरलिफ्ट करून त्यांच्यावर जखमींवर उपचार सुरू आहेत. उर्वरित पर्यटक सुखरूप असल्याची माहिती पनवेल पोलिसांनी दिली आहे. पनवेलमधील निसर्ग ट्रॅव्हलचे मालक ओक यांच्याकडूनही पनवेल शहर पोलिसांनी खात्री केली आहे. दरम्यान, निसर्ग ट्रॅव्हलच्या माध्यमातून पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या नातेवाइकांनी पनवेल शहर पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. आपले नातेवाईक सुरक्षित आहेत की नाही, अशी चिंता नातेवाइकांना सतावत होती. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनीही पोलिस ठाण्यात धाव घेत जखमी व मृत पावलेल्या पर्यटकांची माहिती घेतली.