- मयुरी चव्हाण काकडे कल्याण - मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारी अंबरनाथ आणि कल्याण शहराच्या दौऱ्यावर आहेत. अंबरनाथमध्ये दाखल झाल्यावर ठाकरे यांचे जोरदार स्वागत कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांची बैठक अंबरनाथच्या पनवेलकर सभागृहामध्ये संपन्न झाली. या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला. पितृ पक्षाचा उल्लेख करत राज ठाकरे यांनी थेट एका मराठी चित्रपटाचे नाव घेतले.
जवळपास तीन वर्षानंतर राज ठाकरे अंबरनाथ शहरात आले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत राज ठाकरे नेमका मनसैनिकांना काय सल्ला देतात त्याकडे सर्वांचे लक्ष होतं. बैठकीमध्ये पितृ पक्षाचा विषय निघाला. आपण पितृ पक्षाला वाईट का समजतो असं राज ठाकरे म्हणाले. पुढे त्यांनी दशावतार या चित्रपटाचा उल्लेख करत हा चित्रपट पितृपक्षात दाखवला गेला तरीही चांगला चालला आणि या चित्रपटाने कमाई देखील चांगली केली असं सांगितलं. जमिनीच्या मुद्द्यावरूनही राज ठाकरेंनी महत्त्वाचा कानमंत्र दिला.
राज ठाकरे म्हणाले की, दशावतार चित्रपटात कोकणाच्या जमिनीचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या जमिनी विकू नका जमिनी विकाल तर हद्दपार व्हाल, असं सुद्धा ते म्हणाले. त्याचप्रमाणे अभ्यास करा मतदार याद्यांचा निरीक्षण करा. त्यासाठी नवीन नेमणूक करा, असा आदेश सुद्धा त्यांनी दिला. तसेच आपण पाहिल्यापासून मतदान प्रक्रियेबद्दल आवाज उठवत आहोत. असं सांगत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागा, असेही त्यांनी सांगितलं. मात्र विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरे यांनी युतीबाबत कोणतेही भाष्य किंवा संकेत दिले नाही.