डोंबिवलीकरांचा अभिमान! आर्मीत भरती झालेल्या मयुरेशवर पुष्पवृष्टी, भाजपकडून सत्कार
By अनिकेत घमंडी | Updated: February 26, 2024 13:49 IST2024-02-26T13:49:24+5:302024-02-26T13:49:46+5:30
शशिकांत कांबळे यांनी केला सॅल्युट, मंत्री रवींद्र चव्हाण चालवत असलेल्या संस्थेचे असेही यश

डोंबिवलीकरांचा अभिमान! आर्मीत भरती झालेल्या मयुरेशवर पुष्पवृष्टी, भाजपकडून सत्कार
डोंबिवली: सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या विनामूल्य डोंबिवलीकर न्यू फोर्स अकॅडमीचा विद्यार्थी मयुरेश कदम हा अलीकडेच भारतीय सैन्य दलात (इंडियन आर्मी) भरती झाला आहे. त्यानिमित्ताने भाजपचे ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस, कल्याण लोकसभा प्रमुख शशिकांत कांबळे यांनी सोमवारी कदम याच्यावर पुष्पवृष्टी करत त्याचा यथोचित सन्मान केला. येथील संत सावळाराम क्रीडा संकुलात हा हृद्य सोहळा संपन्न झाला, त्यामुळे वातावरण एकदम भारावले होते, भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन युवकांनी आनंद व्यक्त केला.
याप्रसंगी सत्कार करताना कांबळे म्हणाले की, कदम हा आर्मीत भरती झाला ही आपल्या शहरासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. ही अकॅडमी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली क्रीडा संकुल या ठिकाणी चालू आहे. त्यांचे प्रशिक्षक मुजायत शेख अतिशय मेहनतीने मुलांना घडविण्याचे काम करीत आहेत. कदम यांना मिळालेले यश रूपाने खऱ्या अर्थाने शेख यांच्या कार्याची पोच पावती मिळाली यात संदेह नसावा. याआधीही या संस्थेच्या माध्यमातून अनेक जण पोलीस दलात व भारतीय सैन्यात भरती झालेले आहेत, ही आपणा सर्वांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. सोमवारी मयुरेश कदम याचा सत्कार करण्यात आला. मयुरेशला त्याच्या भारतीय सैन्य दलातील पुढील यशा करिता मनःपूर्वक शुभेच्छा, तसेच त्या सोबतच सोमनाथ हिंगमिरे इंडियन आर्मी ,रितेश तायडे सीआरपीएफ ,सुशील कनोजिया सीआयएसएफ या सर्व जवानांना देखील कांबळे यांनी शुभेच्छा देत त्या युवा जवानांना सॅल्युट केला.