गोळीबार प्रकरणातील आरोपी वैभव गायकवाड याला पकडून देणाऱ्या पाेलिसांना २५ हजाराचे बक्षिस
By मुरलीधर भवार | Updated: January 14, 2025 21:48 IST2025-01-14T21:48:03+5:302025-01-14T21:48:16+5:30
माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी केले जाहीर

गोळीबार प्रकरणातील आरोपी वैभव गायकवाड याला पकडून देणाऱ्या पाेलिसांना २५ हजाराचे बक्षिस
कल्याण-उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी माझ्यावर गोळीबार केला. या प्रकरणातील त्यांचा मुलगा वैभव गायकवाड याच्यासह कुणाल पाटील आणि नागेश बडेराव हे तिघे आरोपी फरार आहे. त्यांना अद्याप अटक झालेली नाही. त्यांना पकडून देणाऱ्या पोलिसांना २५ हजार रुपयांचे बक्षीस माझ्यातर्फे दिले जाईल. ही बक्षीसाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली जाईल असे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी जाहिर केले आहे.
२ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री पोलिस ठाण्यात जागेच्या वादातून महेश गायकवाड यांच्यावर आमदार गायकवाड यांनी गोळीबार केला. या प्रकरणातील आरोपी वैभव गायकवाड हा भाजपचा पदाधिकारी आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तो लोढा आणि दहा गाव परिसरात येऊन जातो याची माहिती पोलिसांना देऊन देखील त्याला पोलिस अटक करीत नाही. भाजपचा पदाधिकारी अस्लयाने पोलिसांवर या प्रकरणी दबाव आहे. भाजपने वैभवला पक्षाच्या पदावरुन दूर केलेले नाही. या प्रकरणी तीन आरोपींना जामीन मिळाला आहे.
या प्रकरणातील आरोपी आमदार गायकवाड हे तळाेजा जेलला असले तरी चेकअपच्या नावाखाली ते जे. जे. रुग्णालयात जातात. त्यानंतर तिथून ते मुंबई फिरतात. त्यानंतर ते पनवेल येथीळ एका आमदाराच्या फार्म हाऊसवर जाऊन पुढे तळोजा जेलला रवाना होता. हा गौप्य स्फोट माजी नगरसेवक गायकवाड यांनी केला आहे. कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करणारा आरोपी विशाल गवळी हा भाजपशी संबधित असल्याने त्याला पोलिस कोठडीत बिर्याणी खाऊ घातली असल्याचा आरोप माजी नगरसेवक गायकवाड यांनी केला आहे.
या गंभीर आरोपासंदर्भात भाजप पदाधिकारी आणि माजी आमदार गायकवाड यांच्या कुटुंबियांकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिली गेली नाही.