- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहर वाहतूक पोलीस विभागाने ओव्हर सीट नेणाऱ्या रिक्षा चालकांना थेट १० हजाराचा दंड आकारल्याच्या निषेधार्थ रिक्षा संघटनेने आक्षेप घेऊन आंदोलनाचा इशारा दिला. रिक्षा संघटनेने याबाबत न्यायालयात बाजू मांडल्यावर न्यायालयाने १० हजाराचा दंड २ हजार कायम केल्याने, रिक्षा संघटनेने समाधान व्यक्त केले.
उल्हासनगर पोलीस वाहतूक विभागाने रिक्षा चालकाकडे परवाना नसणे, गणवेश न घालणे, वाहतुकीचे नियम तोडणे, ओव्हर सीट नेणे याविरोधात कारवाई सुरु केली. दोन दिवसापूर्वी ओव्हर सीट नेणाऱ्या एकूण १० रिक्षावर प्रत्येकी १० हजाराचा दंड ठोटावला. कसाबसा रिक्षाच्या कमाईवर घर संसार चालविणाऱ्या रिक्षा चालकांना ओव्हर सीट नेल्या प्रकरणी १० हजाराचा दंड आकारल्याने धक्का बसला. दंडाची रक्कम मोठी असल्याने नाराज रिक्षा चालकांनी वाहतूक शाखेसमोर एकत्र येत निषेधाची भूमिका घेतली. रिक्षा युनियनचे पदाधिकारी विकी भुल्लर आणि राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा चालकांनी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांशी भेट घेत कारवाईची माहिती घेतली.
शहर रमाकांत चव्हाण रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व युवानेते विक्की भुल्लर यांच्या नेतृत्वाखाली रिक्षा युनियनचे वकील मोहित आहूजा यांच्या माध्यमातून न्यायालयात रिक्षा चालकांची बाजू मांडली. न्यायालयाने रिक्षा चालकांना दिलासा देत १० हजार रुपयांचा दंड कमी करून केवळ २ हजार रुपये केला. या निर्णयामुळे रिक्षा चालकांना मोठा दिलासा मिळाला. तसेच वाहतूक पोलिसांच्या गैरवाजवी कारवाई विरोधात आंदोलन करण्याचा इशारा रिक्षा संघटनेने दिला आहे.