साडेनऊ हजार रुग्ण होम आयसोलेटेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 12:00 AM2021-04-21T00:00:38+5:302021-04-21T00:00:48+5:30

महिनाभरात घरातच तीन जणांचा मृत्यू : डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच सुरू आहेत उपचार

Nine and a half thousand patients home isolated | साडेनऊ हजार रुग्ण होम आयसोलेटेड

साडेनऊ हजार रुग्ण होम आयसोलेटेड

Next



मुरलीधर भवार
लोकमत न्यूज नेटवर्क 
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सरासरी एक हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्ण नव्याने आढळून येत आहेत. महापालिकेची सहा कोविड सेंटर आणि खाजगी ६८ कोविड रुग्णालये पाहता उपलब्ध बेड आणि आढळून येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण व्यस्त आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड खाजगी आणि महापालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध नसल्याने अनेक रुग्ण हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम आयसोलेशनद्वारे घरीच राहून उपचार घेत आहेत. मात्र, ज्या रुग्णांच्या घरी तशी सोय नाही त्यांच्या नातेवाइकांना उपचारासाठी वणवण करावी लागत आहे. काही रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. बेड उपलब्ध झाला तर त्याला आवश्यक असलेला ऑक्सिजन मिळत नाही. कुठे व्हेंटिलेटर नाही. बेड मिळाला तर इंजेक्शन मिळत नाही. इंजेक्शनचा साठा नियंत्रित करूनही उपलब्ध नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी महापालिकेने क्वारंटाइन सेंटर उभी केली होती. एका रुग्णामागे २० जणांना ट्रेसिंग करून त्यांना होम क्वारंटाइन करण्यास सांगितले जाते. होम क्वारंटाइनची आताची संख्या ५ लाख ९ हजार ४१३ आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणारे रुग्ण
खाजगी व सरकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या पाहता निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ९ हजार ५५२ आहे.
कारणे काय ?
महापालिका हद्दीत रुग्णांना बेड मिळत नाही, इंजेक्शन मिळत नाही, त्यामुळे अनेक जण त्यातही कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले रुग्ण घरीच राहून उपचार घेत आहेत. काहींच्या घरी होम आयसोलेशनची सुविधा आहे. काही रुग्ण वृद्ध आहेत, त्यांच्या घरी धावपळ करणारे कोणी नाही. काहींची मुले लहान आहेत. काहींची घरे मोठी आहेत. त्यांच्या घरी स्वतंत्र खोली आहे. त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच होम आयसोलेशनचा पर्याय निवडला आहे. घरी त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांच्या तब्येतीची काळजी पालिकेकडून सतत घेतली जात आहे.

घरातील मृत्यूची टक्केवारी नगण्य
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत होम आयसोलेशनमध्ये राहून घरीच उपचार घेतले जात आहेत. गेल्या महिनाभरात घरी उपचार घेणाऱ्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला. होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्यांची एकूण संख्या पाहता घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण नगण्य आहे.

होम आयसोलेशनसाठी रुग्णाला सक्ती केली जात नाही. त्याच्या घरी तशी सुविधा उपलब्ध असल्यास त्याला होम आयसोलेशनचा सल्ला दिला जातो. महापालिकेच्या कॉल सेंटरवरून रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस केली जाते. होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे.
- डॉ. प्रतिभा पानपाटील, वैद्यकीय अधिकारी.
 

Web Title: Nine and a half thousand patients home isolated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.