बारसूमध्ये स्कार्प लावून आंदोलन करणाऱ्यांचे स्कार्फ काढण्याची गरज - दीपक केसरकर
By पंकज पाटील | Updated: April 29, 2023 14:43 IST2023-04-29T14:43:33+5:302023-04-29T14:43:48+5:30
उगाचच वातावरण चिघळवून सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र रचला जात असल्याचा आरोप शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे.

बारसूमध्ये स्कार्प लावून आंदोलन करणाऱ्यांचे स्कार्फ काढण्याची गरज - दीपक केसरकर
बदलापूर: बारसू रिफायनरी प्रकरणात जे आंदोलन करण्यात आले त्या आंदोलनात स्कार्प लावून ज्या महिला सहभागी झाल्या होत्या त्यांचा शोध घेण्याची गरज आहे. स्कार्प लावून आंदोलनात सहभागी झालेल्यांचे स्कार्फ काढल्यानंतर ते नेमके बारसूचे आहेत की नाही हे उघड होईल. उगाचच वातावरण चिघळवून सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र रचला जात असल्याचा आरोप शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे.
बदलापुरात दीपक केसरकर हे एका कार्यक्रमासाठी आलेले असताना केसरकर यांनी बारसू प्रकरणावर पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये झालेल्या संघर्ष बाबत आपले मत व्यक्त केले. बारसुमध्ये जे आंदोलन झाले त्या आंदोलनात नेमके शेतकरी सहभागी होते का याचा शोध घेण्याची गरज आहे. सरकारला बदनाम करण्यासाठी हा प्रकार घडवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आंदोलनात नेमके कोण सहभागी होत आहे याचा शोध घेतल्यास ते महाराष्ट्राच्या हितासाठी निश्चितच फायदेशीर ठरेल असे मतही त्यांनी व्यक्त केले.
बारसु शेतकऱ्यांनी रोजगार मिळावा किंवा योग्य मोबदला मिळावा यासाठी आंदोलन केल्यास त्यातून सकारात्मक मार्ग काढणे शक्य होईल. मात्र महाराष्ट्राच्या हितासाठी असलेला प्रकल्पाला नाहक राजकीय हेतूने विरोध करणे चुकीचे असल्याचे मत केसरकर यांनी व्यक्त केले. ज्या प्रकल्पामुळे 2 लाख नोकऱ्या उपलब्ध होतील त्या प्रकल्पाला विनाकारण विरोध करणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.