बुद्धिबळ स्पर्धेत मुंबईचा गौरांग बागवे प्रथम, कल्याणमध्ये पार पडली पहिली आमदार चषक स्पर्धा
By सचिन सागरे | Updated: April 17, 2023 16:07 IST2023-04-17T16:05:57+5:302023-04-17T16:07:52+5:30
या स्पर्धेत मुंबईच्या १५ वर्षीय गौरांग बागवे याने प्रथम क्रमांक पटकावला.

बुद्धिबळ स्पर्धेत मुंबईचा गौरांग बागवे प्रथम, कल्याणमध्ये पार पडली पहिली आमदार चषक स्पर्धा
सचिन सागरे
कल्याण : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर व कल्याण तालुका बुध्दीबळ संस्थेद्वारा आयोजित ‘पहिला आमदार चषक’ अखिल भारतीय खुले जलद नामांकन बुध्दीबळ स्पर्धा-२०२३ पश्चिमेतील नटरंग हॉल येथे संपन्न झाली. या स्पर्धेत मुंबईच्या १५ वर्षीय गौरांग बागवे याने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेमध्ये महाराष्ट्रसह १७ राज्यातील ६१३ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
या आमदार चषक स्पर्धाचा बक्षीस समारंभ आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते संपन्न झाला. स्पर्धेतील प्रथम विजेता गौरांग बागवे (मुंबई) याला दुचाकी व चषक, द्वितीय विजेता ग्रँडमास्टर लक्ष्मण आर.आर. (चेन्नई) यांना २० हजारांचे रोख बक्षीस व चषक, तृतीय विजेता मंदार लाड (पुणे) यास १५ हजार रोख बक्षीस व चषक देऊन गौरविण्यात आले. विविध गटातील विजयी स्पर्धकांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी कल्याण तालुका बुध्दीबळ संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय पाटील, शिवसेना शहर प्रमुख रवि पाटील, विधानसभा समन्वयक तथा माजी नगरसेवक प्रभुनाथ भोईर, जयवंत भोईर, मोहन उगले, डॉ.धीरज पाटील, कल्याण तालुका बुध्दीबळ संस्थेचे मोहित लढे, संघर्ष सोमण, डॉ. दीपक तांडेल यांच्यासह राज्यभरातून आलेले खेळाडू व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.