लाेकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: कल्याण-आग्रा रोडवरील लालचौकी परिसरात रस्ता ओलांडताना माय-लेकाला कल्याण-डोंबिवली पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या भरधाव ट्रकने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव अंश अमित सोमेस्कर आणि आई निशा सोमेस्कर, असे आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.
कल्याण पश्चिमेत राहणाऱ्या निशा या त्यांच्या चार वर्षांचा मुलगा अंश याला नर्सरीमध्ये घेण्यासाठी गेल्या होत्या. टिळक चौकातून त्या मुलाला घेऊन कल्याण-आग्रा रोडवर आल्या असता रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकने दोघांना धडक दिली. यात माय-लेकांचा चाकाखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर नागरिकांनी दोघांचे मृतदेह रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आले. मुलाच्या पाठीवर त्याची नर्सरीची बॅग होती. त्यात त्याचे ओळखपत्र होते. त्यावरून पोलिसांनी नर्सरीचालक राजेश उज्जैनकर यांच्याशी संपर्क साधला. उज्जैनकर यांनी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी मृत महिलेची बहीण आणि नातेवाईक त्याठिकाणी पोहोचले हाेते. अपघाताची माहिती ते राहत असलेल्या चाळीत कळताच चाळीतील वातावरण शोकाकुल झाले.
‘आर्थिक मदत द्यावी’
- मुलाचे वडील अमित सोमेस्कर हे कामासाठी बुधवारी बंगळुरूला गेले होते. त्यांना घटनेची कल्पना दिल्यावर ते कल्याणसाठी निघाले आहेत. हा ट्रक कल्याण-डोंबिवली पालिकेच्या अतिक्रमण विभागाचा आहे.
- त्यावर ‘केडीएमसी ऑन ड्यूटी’ असे लिहिले होते. यावेळी संतप्त नागरिकांनी कल्याण-आग्रा रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात मनसेचे माजी आ. प्रकाश भोईर, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष वरुण पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर सहभागी झाले होते.
- यावेळी त्यांनी महापालिकेने कारवाई केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला. पालिकेने मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही केली.
कल्याण-आग्रा रोड हा राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत आहे. रस्त्याच्या कामामुळे दुभाजक काढले होते. दोन ठिकाणी ब्रेकर लावूनही या ठिकाणी अपघात झाला. नागरिकांच्या मागणीनुसार ज्याठिकाणी दुभाजक आवश्यक आहे. त्याठिकाणी ते लावले जातील. -जगदीश कोरे, अभियंता, केडीएमसी