भिवंडी: तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायतीमधील मुनीसुरत कंपाऊंड नजिकच्या स्वागत गोदाम कॉम्प्लेक्स या ठिकाणी असलेल्या फर्निचर गोदाम इमारतीस शनिवारी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग इतकी भयानक होती की या आगीत संपूर्ण इमारत कोसळली असून अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तळ अधिक तीन मजली असलेल्या इमारती मध्ये मोठ्या प्रमाणावर प्लायवूड,रेगझिन,फोम, केमिकल सोल्युशन साठवलेले असल्याने पाहता पाहता या इमारती मध्ये आग पसरत गेल्याने संपूर्ण इमारत आगीच्या भक्षस्थानी पडली आहे.ही आग एवढी भीषण होती की आगीच्या ज्वाला सुमारे दहा किलोमीटर अंतरा वरून दिसत होत्या.आगीची माहिती मिळताच भिवंडी येथील दोन तर कल्याण व ठाणे येथील प्रत्येकी एक अशा चार अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी आग विझवण्यासाठी दाखल झाल्या होत्या.
आगीच्या भक्ष्यस्थानी इमारती मधील १२ गोदामे आली असून आगीच्या ज्वालांनी क्षतिग्रस्त होत इमारतीचा बराचसा भाग कोसळला आहे.या आगीच्या भीतीने नजीकच्या गोदामातील माल सुरक्षित बाहेर काढण्यासाठी कामगारांनी धावपळ सुरू केली होती. तर शेजारी असलेल्या इमारती मधील सर्व कुटुंबीय आपल्या कडील मौल्यवान साहित्य घेऊन बाहेर सुरक्षितस्थळी जाऊन थांबले होते.ही आग विझवताना अग्निशामक दलाचा जवान हरिश्चंद्र वाघ हे जखमी झाले असून ततयांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू केले आहे.
ही आग विझवण्यासाठी पाण्याची कमतरता भासत असल्याने आग आटोक्यात आणण्यात किमान १२ तासाहून अधिक वेळ लागू शकतो अशी माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी राजेश पवार यांनी दिली आहे. दुर्घटनास्थळी भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी घटनास्थळी भेट देऊन अग्निशमन दलाकडून आगीच्या घटनेचा आढावा घेतला.